scorecardresearch

‘उत्तीर्ण’ होण्यासाठीच आंदोलनाचे षडयंत्र?

‘हिंदूस्थानी भाऊ’च्या चिथावणीखोर  भाषणानंतर हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

नामवंत शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग नाही

नागपूर : ‘हिंदूस्थानी भाऊ’च्या चिथावणीखोर  भाषणानंतर हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मात्र, या आंदोलनाचे स्वरूप, सहभागी विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी आणि त्यांच्या शाळांच्या निकालाच्या टक्केवारीवर नजर टाकली असता ‘उत्तीर्ण’ होण्यासाठीच आंदोलनाचे षडयंत्र रचण्यात आल्याची शंका व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, या आंदोलनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांमध्ये एकाही नामवंत शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग दिसून आला नाही. 

दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्याचे शालेय शिक्षण विभागाने ठरवले. मात्र, या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी  सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास शहरातील क्रीडा चौकात शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत गोंधळ सुरू केला. यावेळी काही विद्यार्थ्यांनी धुडगूस घालत शहर बस आणि स्कूलबसवर दगडफेक केली. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.  आंदोलकांकडून ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याची मागणी प्रामुख्याने ठेवण्यात आली. यातील काहीच विद्यार्थी ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन परीक्षा घ्यावी अशी मागणी करत होते. मागील शैक्षणिक सत्रात परीक्षा रद्द करण्यात आल्याने केवळ अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आल्याने ९९ टक्के निकाल लागला होता. त्यामुळे यंदाही अशाच प्रकारे परीक्षा रद्द करून सहज उत्तीर्ण होण्याचा आंदोलकांचा हेतू असल्याची शंकाही उपस्थित केली जात आहे. विशेष म्हणजे, आंदोलनात अनेक विद्यार्थी हे गंमत पाहण्यासाठी आणि आंदोलनाचे संदेश पसरल्यामुळे सहभागी झाल्याचेही सांगत होते.

एकही विद्यार्थिनी कशी नाही?

दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये मुलींची संख्या निम्मी असते. मात्र, सोमवारच्या आंदोलनामध्ये विद्यार्थिनी दिसल्याच नाहीत. त्यामुळे करोनामुळे परीक्षा रद्द करायची असेल तर ती विद्यार्थिनींनाही हवी असती. मात्र, त्यांचा सहभाग नसल्याने परीक्षा रद्दची मागणी एका विशिष्ट गटाची असल्याची चर्चाही दिसून आली. याशिवाय दहावी, आणि बारावीच्या सीबीएससीच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यांचीही परीक्षा मार्च आणि एप्रिल महिन्यात होणार आहे. मात्र, या विद्यार्थ्यांचा आदोलनात कुठेही सहभाग नव्हता.

असा पसरला संदेश..

करोनामुळे  दोन वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. असे असताना, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकत ऑफलाईन परीक्षा कशाला, असा प्रश्न ‘हिंदूुस्थानी भाऊ’ याने समाज माध्यमावर उपस्थित करून विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन करावे, असे आवाहन केले. तसे संदेशही पाठवले. विद्यार्थ्यांच्या अनेक समूहांवर हा संदेश पसरल्याने दुपारच्या सुमारास मोठय़ा प्रमाणात विद्यार्थ्यांनी एकत्र येत, आंदोलनात सुरुवात केली. 

कुणाची फूस?

एका व्यक्तीने आवाहन केले आणि त्याच्या आवाहनावर विद्यार्थ्यांनी एकत्र येत धुडगूस घातला, असे वरवरून वाटत असले तरी असे अचानक विद्यार्थ्यांचे  एकत्र येण्यामागे कोणत्या तरी राजकीय पक्ष व संघटनेची फूस असल्याची शंका आता  व्यक्त करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Conspiracy movement pass participation students reputed schools ysh

ताज्या बातम्या