बांधकामातील निकृष्ट दर्जा तीन वर्षांपूर्वीच उघड, तरीही कारवाई शून्य!

शहरात सिमेंट रस्त्याचे काम सुरू असून त्याबद्दल जनतेच्या तक्रारी आहेत.

सिमेंट रस्त्यावरील भेगांची लांबी मोजताना जनमंचचे पदाधिकारी.
  • रेशीमबाग चौक ते जुनी शुक्रवारी सिमेंट रस्ता
  • जनमंचच्या पाहणीत सत्य उघड

सिमेंट रस्ते बांधकामात अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून करदात्यांच्या पैशांचा अपहार झाल्याचे ग्रेट नाग रोडच्या पाहणीत दिसून आले आहे. या मार्गावर रेशीमबाग चौक ते जुनी शुक्रवारी चौक या दरम्यानच्या सिमेंट रस्त्याला भेगा पडल्या आहेत, रस्ता काही ठिकाणी खाली दबला आहे. ही बाब महापालिकेच्या लक्षात तीन वर्षांपूर्वीच आली, परंतु त्यासाठी अद्याप कुणालाही जबाबदार धरण्यात आले नाही.

शहरात सिमेंट रस्त्याचे काम सुरू असून त्याबद्दल जनतेच्या तक्रारी आहेत. रस्त्यांना काही महिन्यात तडे गेले आहेत. काही ठिकाणी ‘पेव्हर ब्लॉक्स’ तुटलेले आहेत. सिमेंटचे रस्ते असूनही ते काही ठिकाणी खाली दबले आहेत. महापालिका कुठलीच कारवाई करीत नसल्याने ‘जनमंच’ या स्वयंसेवी संघटनेने रस्त्यांचे ‘पब्लिक ऑडिट’ सुरू केले. जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, सल्लागार शरद पाटील, प्रकाश ईटनकर, अ‍ॅड. मनोहर रडके, श्रीकांत दोड, आशुतोष दाभोळकर, प्रदीप निनावे, प्रल्हाद खरसणे यांच्यासह इतर सदस्यांनी आज ग्रेट नाग रोडवरील रेशीमबाग चौक ते जुनी शुक्रवारी चौक रस्त्यांची पाहणी केली. त्यात जुनी शुक्रवारी चौकातून रेशीमबागेकडे येणाऱ्या मार्गावरील सुरेश भट सभागृहाच्या समोर सिमेंट रस्त्याला भेगा पडल्या आहेत. या रस्त्याची वयोमर्यादा ५० वर्षे आहे. या रस्त्याला भेगा असल्याचे महापालिकेला तीन वर्षांपूर्वीच कळले, परंतु अद्याप या कामाची चौकशी झाली नाही.

कुणालाच त्यासाठी जबाबदार धरण्यात आलेले नाही. कंत्राटदाराने काही ठिकाणी भेगा बुजवून ‘पाप’ झाकण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून आले. या रस्त्यांच्या कामात निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरून जनतेच्या पैशाचा अपहार झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.

लोकभावनेमुळे रस्त्यांची तपासणी

जनतेच्या पैशाचा योग्य विनियोग व्हावा आणि शहरातील रस्ते दर्जेदार व्हावेत म्हणून सिमेंट रस्त्याची तपासणी केली जात आहे. तपासणीत या रस्त्यांचा दर्जा चांगला आहे असे आढळून आल्यास शहराचे नागरिक आनंद होईल. परंतु दोन वेगवेगळ्या रस्त्यांच्या तपासणीत असे काही घडलेले नाही, असे जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर म्हणाले. सिमेंट रस्त्यांची सार्वजनिक तपासणी व्हावी, अशी लोकभावना आहे. त्यामुळे जनमंचने १ मे २०१७ पासून जनमंचचे उपाध्यक्ष अमिताभ पावडे यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांच्या चमूकडून तपासणी केली जात आहे. पावडे हे स्वत अनुभवी स्थापत्य अभियंते आहेत. भारतीय विमातळ प्राधिकरणामध्ये अभियंता म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांना धावपट्टय़ा तसेच सिमेंट कॉक्रिटच्या बांधकामाचा अनुभव आहे. आमची चमू रस्त्याची पाहणी करताना केवळ रस्त्यांवरील भेगा बघत नाही तर रस्ता दुभाजकांना लावलेले दगड, पुलांवर आणि फुटपाथला समांतर लावलेले दगड, पाणी वाहून नेण्यासाठी बांधलेल्या नाल्या आणि या नाल्यांवरील झाकणे अशी सर्वंकष पाहणी केली जाते. या पाहणीसाठी संबंधित रस्त्याच्या बांधकामाची प्रमाणित निविदा प्रत, यापूर्वी केलेल्या तपासण्यांचे अहवाल, तसेच इंडियन रोड काँग्रेसच्या मानकांचा आधारे हे रस्ते बांधले जात आहे. त्या मानकांची प्रत ही कागदपत्रे महापालिका आयुक्तांना मागितली. काही ठिकाणी रस्त्याचे कोअर कटिंग नमुने घेण्याची परवानगी देखील मागितली. आयुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. परंतु सर्व कागदपत्रे अद्याप मिळाली नाहीत.

वस्तुस्थिती

जुनी शुक्रवारी चौक ते रेशीमबाग चौक सिमेंट रस्त्याचे काम २०१२ ला पूर्ण झाले. हेडगेवार स्मृती मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या रस्त्याला २२.५ मीटर लांब आणि ६ मिमी ते ६ इंच रुंद भेगा आहेत. अनेक ठिकाणी रस्ता असमतल आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची वाईट अवस्था आहे. सिमेंट रस्ता आणि फुटपाथमधील भाग उबडखाबड असून काही ठिकाणी खड्डे आहेत. येथून नीट चालता देखील येत नाही. दुचाकी वाहनांचा अपघात होण्याचा धोका आहे.

‘‘रेशीमबाग ते जुनी शुक्रवारी या सिमेंट रस्त्याचे काम २०१२ मध्ये झाले. या रस्त्याची पाहणी यापूर्वी झाली. त्यात भेगा आढळून आल्या. केंद्रीय रस्ता संशोधन संस्था (सीआरआरआय) कडून या मोसमात चौकशी केली जाईल. त्यानंतर रस्ता नवीन बांधायचा की भेगा बुजावयाच्या, याबद्दल निर्णय घेण्यात येईल.’’

नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता, (प्रकल्प) महापालिका.

रस्ता नव्याने बांधावा लागणार

जनमंचने ग्रेट नाग रोडवरील रेशीमबाग चौक ते जुनी शुक्रवारी चौक सिमेंट रस्त्याचे ‘पब्लिक ऑडिट’ केले. या रस्त्यांचे काम २०१२-१३ ला पूर्ण झाले. या रस्त्यावर २२.५ मीटर लांब आणि ५ मिलीमीटर ते ६ इंच रुंद भेगा आढळून आल्या. हा रस्ता नव्याने तयार केल्याशिवाय पर्याय नाही. कंत्राटदाराला संपूर्ण रक्कम देण्यात आली. ही रक्कम देण्यापूर्वी कनिष्ठ अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांनी नीट पाहणी करणे आवश्यक होते. त्याशिवाय रक्कम देण्यात आली. ही आक्षेपार्ह बाब आहे. या रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधितावर दंड आकारायला हवे.

अभिताभ पावडे, उपाध्यक्ष, जनमंच.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Construction degradation nagpur municipal corporation