प्रतापनगरातील एका मैदानावर महापालिकेने जलकुंभाची उभारणी सुरू केली असून या जलकुंभातून प्रतापनगर भागातील वस्त्यांऐवजी इतर ठिकाणी पाणीपुरवठा केला जाणार असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
प्रतापनगरातील गणेश कॉलनी, शांती निकेतन कॉलनी व रेल्वे कॉलनी या तीन वस्त्यांचे मिळून गणेश कॉलनीत एक मैदान आहे. या मैदानावर आता जलकुंभ उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. पण, या जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा या भागांतील वस्त्यांना होणार नाही तर तेथून इतर वस्त्यांसाठी पाणी नेण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
दुसऱ्या वस्तीसाठी पाण्याची सोय करायची असेल तर त्यासाठी गणेश कॉलनीतील मैदानात जलकुंभ उभारण्याची गरज काय, असा सवाल नागरिकांनी केला आहे. गणेश कॉलनी, शांती निकेतन रेल्वे कॉलनीला सध्या गोपालनगरमधून पाणीपुरवठा केला जातो. तो कमी दाबाने होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे नवीन जलकुंभातून या भागातील वस्त्यांनाही पाणी पुरवठा व्हावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.