नागपूर : लग्नसराईच्या दिवसात सोन्याचे दर एक लाखावर गेल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली होती. परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशीच बुधवारी (३० एप्रिल २०२५ रोजी) सोन्याच्या दर घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजच्या दिवशी सकाळी नागपुरातील सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर काय होते, हे आपण बघू या.

अक्षय तृतीयेच्या दिवशी नागरिक मोठ्या संख्येने सोने- चांदीचे दागिने खरेदी करतात. त्यामुळे नागपूरातील काही सराफा व्यवसायिकांकडे सकाळपासून ग्राहकांची गर्दी दिसत आहे. त्यातच दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. नागपुरात सोन्याचे दर विक्रमी उंचीवर असल्याने ग्राहकांमध्ये चिंता होती. दरम्यान नागपुरातील सराफा बाजार २२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता सराफा बाजार उघडल्यावर सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी जीएसटी आणि मेकिंग चार्ज वगळून ९९ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९२ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७७ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६४ हजार ६०० रुपये होते. त्यानंतर सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याचे संकेत होते. परंतु उलट घसरण होतांना दिसत आहे.

दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात बुधवारी (३० एप्रिल २०२५ रोजी) सकाळी ९.३० वाजता सोन्याचे दर घसरल्याचे दिसत आहे. हे दर गेल्या काही आठवड्यातील सर्वात कमी आहे. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात ३० एप्रिलला सकाळी सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९५ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८९ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७४ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६२ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटी आणि मेकिंग चार्जसर एक लाखावर गेल्यानंतर ३० एप्रिलला नागपुरात २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ३ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ३ हजार २०० रुपये, १८ कॅरेटसाठी २ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी २ हजार ३०० रुपये घसरल्याचे दिसत आहे.

चांदीच्या दरातही बदल…

नागपुरातील सराफा बाजार उघडल्यावर २२ एप्रिल २०२५ रोजी चांदीचे दर दर प्रति किलो ९७ हजार रुपये होते. हे दर बुधवारी (३० एप्रिल २०२५ रोजी) सकाळी बाजार उघडल्यावर ९.३० वाजता प्रति किलो ९८ हजार २०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरातील बाजारात २२ एप्रिलच्या तुलनेत ३० एप्रिलला चांदीचे दर प्रति किलो १ हजार २०० रुपयांनी वाढल्याचे दिसत आहे.