सलग दोनदा पुरामुळे विस्कळीत झालेले विदर्भातील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच शनिवारी रात्रीपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाने विदर्भात ठाण मांडले आहे. यामुळे ७५ वा स्वातंत्र्यदिन देखील पावसातच साजरा करावा लागला.

संततधारेमुळे नागपूरसह यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली-आरमोरी, गडचिरोली-चामोर्शीसह १२ मार्ग बंद करण्यात आले आहेत. गोंदिया जिल्ह्यातीलही अनेक मार्ग बंद झाले आहेत. तर भंडाऱ्यात देखील हीच स्थिती आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ईरइ धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. अकोला, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यातही रविवारपासून संततधार आहे. तर वर्धेतही रात्रीपासून पाऊस सुरू आहे.

नागपूर जिल्ह्यात देखील संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्वातंत्रदिनाला युवकांची नेहमी फुटाळा, अंबाझरी तलावावर मोठी गर्दी असते. मात्र, पावसामुळे आज हा उत्साह काहीसा कमीच होता.