गडचिरोली : उद्धवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख महेश केदारी व उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. मद्यपान करतानाचा कथित फोटो आणि शिवीगाळ करत असल्याची ध्वनिफीत व्हायरल करुन कात्रटवार यांनी केदारींवर गंभीर आरोप केले आहेत. हे सर्व आरोप केदारी यांनी फेटाळून लावले. दोन दिवसांपूर्वीच माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येे (अजित पवार गट) प्रवेश केल्याने पक्षाला खिंडार पडले होते. उध्दवसेनेत नुकतेच संघटनात्मक फेरबदल करण्यात आले. पूर्वी तिन्ही विधानसभा क्षेत्रांमध्ये तीन जिल्हाप्रमुख होते, आता गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांच्यावर जिल्हाप्रमुख म्हणून तिन्ही विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली. माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांना जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती दिली होती, त्यामुळे त्यांनी पक्षत्याग करुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) उडी घेतली.
दरम्यान,जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरविंद कात्रटवार यांना उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती दिली. त्यामुळे ‘डिमोशन’ झाल्याची खंत व्यक्त करुन त्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंविरुध्द दोन दिवसांपूर्वी तक्रार केली. शिवाय सोशल मीडियावर पोस्ट करुन टोकाचे आरोप केले. त्यानंतर त्यांनी कथित ध्वनिफीत शेअर केली, यात शिव्यांची लाखोली वाहिल्याचे ऐकावयास मिळत आहे. कात्रटवार यांनी कथित दोन फोटो शेअर करुन महेश केदारी हे मद्यपान करत असल्याचा आरोप करुन ‘असा माणूस उध्दवसेनेचा जिल्हा संपर्कप्रमुख होऊ शकतो का’, असा सवाल केला.
भाजपशी हातमिळवणी
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत केदारी यांनी भाजपशी हातमिळवणी केली होती, असा आरोप कात्रटवार यांनी केला. यामुळे उध्दवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
वैयक्तिक जीवनात घरी कोण काय करतो या बाबी जाहीर करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? पक्षात कोणाला कोणते पद द्यायचे याचा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन होतो, त्यामुळे सर्वांचे समाधान करता येत नाही. कोणतेही पद छोटे नसते, काम करुन पक्ष मोठा करायचा असतो.आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत, त्यामुळे त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवायची आवश्यकता नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आम्ही आघाडीधर्म पाळून काँग्रेसचा प्रामाणिकपणे प्रचार केला.या आरोपात कुठलेही तथ्य नाही.- महेश केदारी, जिल्हा संपर्कप्रमुख, ठाकरे गट.