चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांनी ‘मित्रा’च्या बंगल्याचे पुरापासून संरक्षण व्हावे यासाठी ९५ लाखांचा खर्च करून नाल्यात बांधलेली ‘भिंत’ बुधवारी विधानसभेत चांगलीच गाजली.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नैसर्गिक नाला अरूंद करून भिंतीचे बांधकाम करणाऱ्या अभियंत्यावर काय कारवाई केली असा थेट प्रश्न जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना करित ‘ओन्ली ॲक्शन, नो रिॲक्शन’ अशी मागणी केली. तर कॉग्रेस विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनीही लोकवस्ती वाचविण्यासाठी नाही तर श्रीमंतांसाठी भिंत बांधली आहे. तेव्हा फुकटचा खर्च करणाऱ्यांवर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला.

शहरातील हवेली गार्डन मार्गावर आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यवसायिक मित्राच्या बंगल्याला लागून वाहणाऱ्या नाल्यावर बांधलेली भिंत मागील एक ते दिड महिन्यापासून चर्चेचा विषय ठरली आहे. मृद व जलसंपदा विभागाच्या दक्षता व गुणनियंत्रक विभागाचे कार्यकारी अभियंता अनंत जगताप यांनी या भिंतीची चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे जगताप यांनी मागील आठवड्यात प्रत्यक्ष भिंतीची पाहणी केली व राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे.

दरम्यान विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्न उपस्थित करून भिंतीचा वाचा फोडली. मुनगंटीवार म्हणाले, “नाल्यातील भिंतीच्या योग्य नियोजनाअभावी नाल्यांशेजारी राहणाऱ्या वस्त्यांना फटका बसणार आहे. नाल्यांची संरक्षक भिंत नियमांनुसार बांधली नाही, भिंतीमुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला तर त्या अभियंत्यांवर कारवाई करणार का? भिंतीच्या दुरुस्तीबद्दल सरकारचं नियोजन काय?” असा प्रश्न केला. यावर उत्तर देताना मंत्री संजय राठोड यांनी, नाल्यांची रुंदी तपासू, ती वाढवावी लागेल का ते पाहू.

भूमीअभिलेख विभागाकरवी जिल्ह्याधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चौकशी करू. उर्वरित नाल्याचं बांधकाम करण्यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवू.” असे सांगितले. मंत्री राठोड यांचं उत्तर ऐकून मुनगंटीवार यांनी, “नाल्याची जितकी नैसर्गिक रुंदी आहे तितकीच राहिली पाहिजे याची खबरदारी शासन घेणार आहे का?” यावर मंत्री राठोड यांनी केवळ ‘सजेशन फॉर ॲक्शन’ एवढंच उत्तर दिलं.

यावर मुनगंटीवारांनी नाराजी व्यक्त करित ॲक्शन, ओन्ली ॲक्शन, नो रिॲक्शन असं उत्तर असलं पाहिजे. मंत्र्यांकडून हमी यायला हवी की नाल्याची नैसर्गिक रुंदी तशीच ठेवली जाईल. ती हमी न देता सजेशन फॉर ॲक्शन हे काय उत्तर आहे? हे तर व्दिअर्थी उत्तर झालं. हे काय दादा कोंडकेंचं उत्तर आहे? त्याऐवजी नाल्याची रुंदी निश्चित राहील याची हमी द्या.” असेही मुनगंटीवार म्हणाले. मुनगंटीवारांच्या नाराजीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्री संजय राठोड यांना सूचना केली की मुनगंटीवार यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार उपाययोजना करावी.

यावेळी कॉग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनीही बांधकाम पूर्णत: चुकीचे झाले आहे. लोकवस्ती वाचविण्यासाठी नाही तर श्रीमंताचा बंगला, भूखंड वाचविण्यासाठी ही भिंत आहे. भूखंडाचे लेआऊट टाकून संबंधित व्यक्तीला फायदा पोहचविण्यासाठी या संरक्षण भिंतीची निर्मिती केली आहे. तेव्हा जे जे दोषी आहे त्यांच्यावर व ९८ लाखाचा फुकटचा खर्च करायला लावणाऱ्यांवर कारवाई करणार का असाही प्रश्न वडेट्टीवार यांनी केला.

विशेष म्हणजे निकटवर्तीयाला फायदा पोहचविण्यासाठी भिंत बांधल्याचे लेखी उत्तर याच विभागाने दिल्याचेही वडेट्टीवार यांनी निदर्शनास आणून दिले. दरम्यान या सर्व प्रश्नांवर जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सर्व गोष्टीची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करून कारवाई करायला लावू असे उत्तर दिले. एकूणच विधानसभेत भिंत चांगलीच गाजली. यामुळे आमदार जोरगेवार अडचणीत आले आहेत.

‘…आता विरोधी पक्षाची गरज नाही’

वादग्रस्त भिंतीवर बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी वडेट्टीवार यांना विरोधी पक्ष नेते व्हायचे आहे. मात्र, आता आमच्या पक्षाकडूनच प्रश्न विचारले जात असल्यामुळे त्यांना विरोधी पक्ष नेते केले नाही तरी चालेल असे म्हणत भिंत बांधलेल्या नाल्याच्या शेजारी झोपडपट्टी आहे. लोकांकडून निवेदन आल्यामुळेच भिंतीचे बांधकाम केले. या नाल्यावर आणखी तीन कामे प्रस्तावित आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वडेट्टीवार मंत्री असतांना नाल्यावर संरक्षिण भिंतीसाठी ९२ कोटींचा प्रस्ताव होता. पूर्ण नाल्याला बांधकाम करावे, नाल्याची रूंदी कमी न होता मूळ स्वरूपात करावे असेही जोरगेवार म्हणाले.