नागपूर: सुनेत्रा अजित पवार यांनी ३१ जानेवारीला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या रुपाने महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना गोपनियतेची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या. मात्र, या चार दिवसांतच त्यांचा शपथविधी बेकायदेशीर आहे, अशी तक्रार खुद्द राज्यपालांकडे करण्यात आली व पुन्हा शपथ घ्यावी अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पुन्हा होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्त्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यावर पुन्हा एकदा वर्धा येथील तक्रारदार यांनी उत्तर पाठवले. त्यामुळे या सर्व वादावर आता राज्यपाल काय निर्णय घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.

वर्धा येथील ॲड. हर्षवर्धन शोभा बाबाराव गोडघाटे यांनी राज्यपालांना एक पत्र दिले आहे. त्यामध्ये त्यांनी पवार यांच्या शपथविधी वर आक्षेप घेतला. तसेच राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनाही संविधानाचा दाखला देत उत्तर दिलेले आहे. यामुळे नवीन वाद निर्माण झाला ते पाहूया.

ॲड. हर्षवर्धन शोभा बाबाराव गोडघाटे यांनी रूपाली ठोंबरे पाटील यांना उत्तर पाठवले. या पत्रात सांगितले की, सुनेत्रा अजित पवार यांचा ३१ जानेवारीला झालेला उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी, असंवेधानीक आहे, यावर राज्यपाल यांना लेखी निवेदन दिल्यानंतर, पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी तुम्ही माझ्या दिलेल्या निवेदनावर प्रतिक्रिया दिली. आपण प्रतिक्रिया देताना हेतू पुरस्कर माझे नाव टाळले, परंतु प्रतिक्रिया देताना आपण माझ्या ज्ञानाला आव्हान दिले. प्रसिद्धीसाठी केलेले काम आहे, शून्य किम्मत आहे असे आपन बेजबाबदार वक्तव्य केले. मी तुम्हाला भारतीय संविधानातील तरतूद दाखवायला तयार आहे. आपन दोघे ही प्रसार माध्यमांसमोर बसून भारतीय संविधान हाती घेऊन, आप-आपली कायदेशीरपणे भूमिका मांडू, काय खरे काय खोटे हे एकदाचे होऊनच जाऊ द्या अशी तुमच्या लहान भावाकडून तुम्हाला कळकळीची विनंती आहे.

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १६४ नुसार मंत्र्यासंबधी अन्य तरतुदी (१) मुख्यमंत्री, राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणी इत्तर मंत्री मुख्यमंत्र्यांच्या सल्यानुसार राज्यपालाकडून नियुक्त केले जातील आणि राज्यपालाची मर्जी असे पर्यंत ते मंत्री पद धारण करतील. (३) मंत्र्याने आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राज्यपाल त्या प्रयोजनार्थ तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या नमुन्यानुसार त्यास पदाची व गोपनियतेची शप्पथ देईल अशी तरतूद आहे.

भारतीय संविधानाच्या ३ अनुसूचित राज्याच्या मंत्र्याकरिता पदाच्या शपथेचा नमुना दिला आहे तो पुढीलप्रमाणे, ५ राज्याच्या मंत्र्याकरिता पदाच्या या शपथेचा नमुना, “ मी क ख ईश्वर साक्ष शपथ घेतो कि / गांभीर्य पूर्वक प्रतिज्ञा करतो कि, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे. अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. ( मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन ) मी ……. राज्याचा मंत्री म्हणून माझी कर्तव्ये निष्ठापूर्वक व सदसदविवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा या नुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल.६ राज्याच्या मंत्र्याकरिता पदाच्या गुप्ततेच्या शपथेचा नमुना “ मी क ख ईश्वर साक्ष शपथ घेतो कि / गांभीर्य पूर्वक प्रतिज्ञा करतो कि, ……. राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब, असा मंत्री म्हणून माझी कर्तव्य यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरव्ही मी कोणत्याही व्यक्तीला किवा व्यक्तींना, प्रत्यक्षपणे व अ प्रत्यक्ष पणे कळविणार नाही किवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. अशा प्रकारचा नमुना आहे.