नागपूर : उपराजधानीतील गजबजलेल्या भागातील उपाहारगृहांमुळे त्याला लागून असलेल्या रहिवासी व कार्यालयीन इमारतीतील नागरिकांना नवीन त्रासाला समोर जावे लागत आहे. या उपाहारगृहातील वायुउत्सर्जन पंख्यामुळे (एग्झॉस्ट फॅन)  खाद्यपदार्थाचा उग्र वास थेट शेजारील घर, इमारतीतील नागरिकांच्या नाका-तोंडात जातो. हा गंभीर विषय असतानाही अन्न व औषध प्रशासन, महापालिकेचे  दुर्लक्ष होत आहे.

नागपुरात दीड ते दोन हजार लहान-मोठी उपाहारगृहे आहेत. त्यात सावजी भोजनालय व खानावळींचाही समावेश आहे. यापैकी निम्मी उपाहारगृहे ऑनलाईन खाद्यपदार्थ उपलब्ध करतात. तेथील पाकगृहात ‘एग्झॉस्ट फॅन’ लावले जाते. परंतु याचा त्रास उपाहारगृहाच्या शेजारी राहणाऱ्यांना होऊ नये काळजी घेतली जात नाही. त्यामुळे शेजारच्या इमारतीतील नागरिकांच्या नाका-तोंडात पदार्थाचा उग्र वास जातो. रोज होणारा हा त्रास त्यांच्या आरोग्यावर परिणाम  करणारा ठरतो. त्यांना श्वसनाशी संबंधी आजारही होण्याची शक्यता आहे. शहरातील सर्वाधिक सावजी भोजनालय गोळीबार चौकात आहेत. तसेच इतर उपाहारगृहे व भोजनालये वर्धमाननगर, सी. ए. रोड, गांधीसागर तलाव, कॉटन मार्केट चौक, बजाजनगर, धंतोली, महाल, कमाल चौक, सक्करदरा चौक परिसरात आहेत. यापैकी ७० टक्केहून अधिक उपाहारगृहांच्या शेजारी निवासी इमारती, वस्त्या आहेत. काही ठिकाणी दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये भोजनालये आहेत. तेथील नागरिकांना वरील त्रासाला रोज तोंड द्यावे लागते.

शाकाहारी नागरिकांना फटका

शाकाहार करणाऱ्यांना मांसाहारी पदार्थाचा वासही सहन होत नाही. ते हे पदार्थ तयार होणाऱ्या उपाहारगृहात जेवणेही पसंत करत नाहीत. त्यांच्या वस्तीत किंवा इमारतीशेजारी मांसाहार पदार्थाची उपाहारगृहे सुरू झाल्याने तेथील एग्झॉस्ट फॅनमुळे या पदार्थाचा उग्र वास त्यांच्या नाका-तोंडात जातो. त्यामुळे त्यांच्यात संताप वाढत आहे.

रुग्णांना अधिक त्रास

खाद्यपदार्थ तयार करीत असताना त्याचा वास हवेमुळे इतरत्र पसरतो. तो श्वसनाचे आजार असणाऱ्यांच्या नाका-तोंडात गेल्यास त्यांचा त्रास वाढतो. इतरांनाही याची बाधा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

डॉ. अशोक अरबट, श्वसनरोग तज्ज्ञ, नागपूर.

अमरावती मार्गावर आमच्या घराशेजारी दोन हॉटेल्स आहेत. तेथील ‘एग्झॉस्ट फॅन’मधून फोडणीचा उग्रवास इमारतीतील  नागरिकांच्या नाका-तोंडात जातो. त्याचा प्रचंड त्रास होतो. हॉटेल मालकांनी किमान  कुणाला त्रास होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. महापालिका आणि एफडीएनेही नियमावली तयार करायला हवी.

विवेक गिरी, त्रस्त नागरिक