लोकसत्ता टीम अमरावती: मागील काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून करोनाबाधित सक्रीय रुग्णांची संख्या ३३ वर पोहचली आहे. दरम्यान, शहरातील विलास कॉलनीत राहणाऱ्या ५४ वर्षीय पुरूषाचा हायटेक रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ६ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. हे सर्व रुग्ण अमरावती शहरातील आहेत. सध्या ग्रामीण भागातील ४ तर शहरातील २९ असे ३३ सक्रीय रुग्ण आहेत. पहिल्या दोन लाटेप्रमाणे सध्या असलेले करोना उत्परिवर्तन घातक नाही मात्र मागील काही दिवसात शहरात आढळलेल्या करोना रुग्णांमध्ये तीन नवे उत्परिवर्तन आढळले आहेत, पूर्वी हेच उत्परिवर्तन युरोप, अमेरिकेत आढळले आहेत. नविन उत्परिवर्तनामुळे घाबरण्याचे कारण नाही, मात्र प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात सध्या वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला, ताप आजाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. यातच जिल्ह्यात आतापर्यंत ‘एच३ एन२’ चे पाच रुग्ण आढळून आले. त्यापैकी दोन रुग्णांना सुटी देण्यात आली असून, तीन रुग्णांवर इर्विन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ३३ करोनाबाधित सक्रिय रुग्ण असून त्यांची लक्षणे सौम्य असल्याने त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. परंतु, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली तर खबरदारी म्हणून जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षाची तयारी केली आहे.