नागपूर : राज्यात करोनामुळे १४ सप्टेंबर २०२१ पर्यंत ४९३ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पैकी ३८३ पोलीस कर्मचाऱ्यांना १९१ कोटी ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते संजय थुल यांनी पुढे आणली आहे.

राज्यात करोनाचा पहिला रुग्ण मार्च २०२० मध्ये आढळला. टाळेबंदीत पोलीस सेवा बजावत होते. हे करताना १४ सप्टेंबपर्यंत राज्यात मुंबई वगळून ३७० तर मुंबई शहरात १२३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, शासनाने पोलिसांचा करोनाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह साहाय्य देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार १४ सप्टेंबपर्यंत मुंबई शहर वगळून राज्यातील २७७ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना १३८ कोटी ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान कुटुंबीयांना अदा केले गेले. तर पोलीस आयुक्त बृहन्मुंबई कार्यालयातील १०६ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५३ कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान शासनाने मंजूर करून कुटुंबीयांना अदा केले आहे.