scorecardresearch

शहरात आज आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

करोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.

नागपूर : करोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. शासनाने आता सर्वच निर्बंध हटवल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संघटनांकडून मिरवणुका, महाप्रसाद आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दीक्षाभूमी येथे अनुयायांचा जनसागर लोटतो. यामुळे स्मारक समितीकडून संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वारातून अनुयायांना प्रवेश दिला जाणार आहे. या शिवाय, कामठीतील ड्रॅगेन पॅलेस येथेही प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॅरेथॉन दौड समितीच्यावतीने सकाळी ६ वाजता संविधान चौक ते दीक्षाभूमी चित्रकला महाविद्यालयापर्यंत दौडचे आयोजन करण्यात आले आहे. दौड स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला क्रीडामंत्री सुनील केदार, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, बबनराव तायवाडे, प्रा. विजय बारसे, नितीन सरदार उपस्थित राहतील.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने ‘आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान’ या विषयावर इतिहास विभाग प्रमुख डॉ. अनिल सिंगारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालयात सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र कुलगुरू डॉ. संजय दुधे उपस्थित राहतील. बहुजन समाज पक्ष नागपूर जिल्हा आणि शहरच्या वतीने बहुजन भवन येथील पक्ष कार्यालयात आंबेडकर जयंती व पक्षाचा स्थापना दिवस साजरा केला जाईल.

इंदोरा बुद्ध विहारातून मिरवणूक

बुधवारी रात्री इंदोरा बुद्ध विहारातून मिरवणूक काढण्यात आली. तत्पूर्वी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष आणि धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळय़ाला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी पंचशील ध्वज, बग्गी, रथ आकर्षणाचे केंद्र ठरले. मिरवणुकीत भंते धम्मबोधी, भंते भीमा बोधी, भंते धम्मप्रकाश, भंते नागवंश, भंते महानामा, भंते आनंद, भंते मिलिंद, भंते नागानंदा, भंते धम्मप्रकाश, भंते ज्ञानबोधी, भंते नागाप्रकाश आदींसह बौद्ध बांधव सहभागी झाले होते.

सहा हजार पोलीस तैनात ; दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, संविधान चौकात विशेष सुरक्षा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संपूर्ण शहरात सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस व संविधान चौकात पोलिसांचा विशेष बंदोबस्त राहणार आहे. राज्य राखीव पोलीस दल व होमगार्डचे ६०० जवानही पोलिसांच्या मदतीला असतील.  पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी सायंकाळी बंदोबस्ताचा आढावा घेत पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले. दीक्षाभूमी येथे ४० पोलीस अधिकाऱ्यांसह ५०० पोलीस व शीघ्र कृती पथकाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. या ठिकाणांवर ‘वॉच टॉवर’ही उभारण्यात आले आहेत. सीसीटीव्हीद्वारे प्रत्येकाच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष असेल. याशिवाय, ड्रॅगन पॅलेससह कामठीतील जयस्तंभ चौक, इंदोऱ्यातील भीमचौक, बेझनबाग, त्रिशरण चौक, सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील डॉ. आंबेडकर चौक आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona outbreak celebrate simply various programs occasion ambedkar jayanti city today ysh

ताज्या बातम्या