करोनाकाळातील मानधनापासून कलावंत वंचित

गेल्या महिन्यात सांस्कृतिक कार्यमंर्त्यांनी ५६ हजार कलावंतांना प्रत्येकी पाच हजार रुपये मानधन देण्याचे जाहीर केले.

जिल्हास्तरावरील समितीकडून यादीच नाही

नागपूर : करोनाकाळात शहर व ग्रामीण भागातील कलावंत, लोककलावंत सर्वच अडचणीत आले होते. यामुळे शासनाने राज्यातील ५६ हजार कलावंतांसाठी प्रत्येकी ५ हजार आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी समिती स्थापन करत अर्ज मागवले होते. मात्र महिना लोटला तरी सांस्कृतिक संचालनालयाकडे अर्ज न पोहचल्याने कलावंत मानधनापासून वंचित आहेत.

गेल्या महिन्यात सांस्कृतिक कार्यमंर्त्यांनी ५६ हजार कलावंतांना प्रत्येकी पाच हजार रुपये मानधन देण्याचे जाहीर केले. त्यासाठी लोककलावंतांची यादी तयार करण्यासाठी संचालनालय स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने आपापल्या जिल्ह्यातील लोककलावंतांचे अर्ज मागवून ती यादी संचालनालयाकडे देणे अपेक्षित होते. मात्र गेल्या महिनाभरापासून यादी संचालनालयाकडे आली नसल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील विविध कलावंतांची नोंदणी करण्याची मागणी आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाले. आता त्यांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत ही जिल्हास्तरावर दिली जाणार आहे.

त्यामुळे त्या-त्या जिल्ह्यातील कलावंतांची यादी जिल्हाधिकारी किंवा सांस्कृतिक विभागाकडे असणे गरजेचे आहे. मात्र कलावंतांची यादी तयार झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

करोनाच्या काळात कलावंतांना मानधन देण्याची योजना जाहीर झाल्यानंतर मानधन समिती स्थापन करण्यात आली. समितीकडून लोककलावंतांची यादी तयार केली जात असताना ती संचालनालयाकडे आली नाही. जिल्हाधिकाऱ्यामार्फत संचालनालयाकडे यादी येत असल्यामुळे ती आल्यावर मुंबईला संचालनालयाला पाठवण्यात येईल.     – संदीप शेंडे, कार्यक्रम अधिकारी,   सांस्कृतिक संचालनालय

लोककलावंतांच्या जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत संचालनालय स्तरावर करोना जाणीव जागृती अभियान कलावंत निवड समिती स्थापन केल्यानंतर आमच्याकडे काही नावे आली आहेत. अनेकांचे दूरध्वनी आले असून त्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे नावे देण्यास सांगितले आहे. आमच्याकडे जी नावे आली ती आम्ही लवकरच संचालनालयाकडे पाठवू. – प्रमोद मुनघाटे, समिती सदस्य

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Corona virus infection deprived of honorarium akp