‘एसटी’च्या मालवाहतूक दरांत वाढ

करोनामुळे प्रवासी वाहतुकीवर मर्यादा असल्याने एसटीने १ मे २०२० पासून मालवाहतूक सुरू केली.

st-bus
संग्रहित छायाचित्र

|| महेश बोकडे

नागपूर : करोनामुळे एसटीची आर्थिक स्थिती हलाखीची झाली असून कर्मचारी-अधिकाऱ्यांना वेतन देतानाही महामंडळाची दमछाक होत आहे. दुसरीकडे डिझेलचे दर वाढल्याने महामंडळाच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी एसटीने मालवाहतुकीच्या दरात १ जुलै २०२१ पासून प्रति किमी २ रुपयांची वाढ करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता मालवाहतुकीचे दर ४६ ऐवजी ४८ रुपये प्रति किमी लागणार आहेत.

करोनामुळे प्रवासी वाहतुकीवर मर्यादा असल्याने एसटीने १ मे २०२० पासून मालवाहतूक सुरू केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने १ मे २०२० ते ३१ मे २०२१ पर्यंत एसटीने ९५ हजार फेऱ्यांतून ७ लाख मेट्रिक वाहतुकीचा टप्पा ओलांडला. या १ कोटी ४० लाख किलोमीटरच्या वाहतुकीतून एसटीला ५६ कोटींचे उत्पन्नही मिळाले. दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे एसटीने १ जुलैपासून १०० किमीपर्यंत मालवाहतुकीचे भाडे ४८ रुपये प्रति किमी तसेच एकेरी वाहतुकीसाठी कमीत कमी ३,५०० रुपये निश्चित केले आहे. १०१ ते २५० किमीसाठी ४६ रुपये प्रति किमी तर २५१ किमीहून अधिक अंतरासाठी प्रति किमी ४४ रुपये दर ठरवण्यात आले आहे.

पहिल्या वर्षी चांगला प्रतिसाद

एसटीने मालवाहतुकीच्या उपक्रमाला महाकार्गो नाव दिले आहे. त्यासाठी १,१५० प्रवासी गाड्यांमध्ये अंशत: बदल करून त्यांना  ट्रकमध्ये रूपांतरित केले  आहे.

इंधनाचे दर वाढल्याने प्रति किमी २ रुपयांची वाढ करण्याचे पत्र महामंडळाकडून मिळाले आहे. परंतु कुणी व्यावसायिक सातत्याने मालवाहतुकीचा करार करत असल्यास त्याच्या क्षमतेसह इतर स्थिती बघून २ रुपयांपर्यंत प्रति किमी सवलत देण्याचे अधिकार विभाग नियंत्रकांना आहे. – नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, नागपूर.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona virus infection st bus increase in freight rates akp