मालवाहतूकदारांचा वाहतुकीस नकार; रिकामे वाहन न्यावे लागत असल्याचा युक्तिवाद

नागपूर : टाळेबंदीच्या काळात व्यापाऱ्यांच्या गोदामातील माल दुकानापर्यंत पोहोचवून देण्यास मालवाहतूकदार नकार देत असल्याने जीवनावस्यक वस्तूंचा बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे.व्यापारी माल पोहोचवून देण्यासाठी पैसे देतात पण तेथून रिकामे वाहन आणावे लागते. त्यामुळे मालवाहतूकदार माल नेण्यास नकार देत आहेत हे येथे उल्लेखनीय.

टाळेबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची आवक कमी झाल्याने तुटवडा निर्माण झाला असून शहरात अथवा इतर राज्यातून येणाऱ्या      वस्तूंचे उत्पादन करणारे कारखाने बंद आहे. त्यामुळे कारखान्यात किंवा वितरकाकडे जेवढा माल शिल्लक आहे तेवढा वितरित केला जात होता. मात्र आता टाळेबंदीलाही आठवडा झाला असून मालाची कमतरता भासू लागली आहे. नागपुरात बहुतांश माल हा मुंबई, दिल्ली, औरंगाबाद, हैद्राबाद, बंगळुरू येथून मोठय़ा संख्येने येतो. यामध्ये शाम्पू, सॉस, जॅम, पावडर, साबण, कॉफी आदीचा समावेश आहे. मध्यप्रदेश येथून गहू,पोहा, खाद्य तेल येते. मात्र आता अनेक दुकानांमध्ये या वस्तूंची चणचण जाणवू लागली आहे. त्याचे मुख्य कारण मालवाहतूकदारांनी माल नेण्यास दिलेला नकार हेच आहे.

टनच्या हिशोबाने ट्रकचे भाडे ठरते. मोठय़ा ट्रकमध्ये १६,२४,३२ टन माल येतो. मुंबईहून जर २० टन माल शहरात येत असेल तर त्यासाठी ३० ते चाळीस हजार रुपये आकारण्यात येतात. त्यात दहा ते पंधरा हजार रुपयांचे डिझेल लागते. तसेच वाहनचालक आणि त्यासोबत असलेल्यांची रोजीरोटी देखील आहे. मात्र ट्रक माल घेऊ शहरात आल्यावर त्याला परतीसाठी ट्रक रिकामा घेऊन जावा लागत आहे. अशात मिळणारी मिळकत डिझेलमध्ये जात असल्याने मालवाहतूकदारांना तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे इतर राज्यातून शहरात येणारे ट्रक कमी झाले असून परिणामी मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे.

माल येत नसल्याने त्याची कमतरता आता भासू लागली आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून वितरकाकडे मालाची थोडय़ा प्रमाणात साठवणूक होती. तीच गेल्या काही दिवसांपासून दुकानांमध्ये वितरीत करण्यात येत होती.मात्र आता वितरकाकडील असलेला माल देखील संपायला आला आहे. त्यातच आता मालवाहतूकदारांनीही इतर राज्यातून माल आण्यास नकार दिल्याने जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. पुढील काही दिवसात जो माल आहे तोही संपण्याच्या मार्गावर आहे.

लांबपल्ल्यांची वाहतूक बंद

लांब पल्ल्यांच्या गाडय़ा सध्या बंद आहे. चन्नई, कोलकाता, दिल्ली येथून वाहने येत नाही. त्यामुळे मालाचा साठा कमी झाला आहे. यामार्गावरील एक ट्रकचे एका फेरीचे भाडे लाखांत जात असून परतीला ट्रक खाली जात आहे.तसेच महामार्गावरील धाबे, हॉटेल बंद असल्याने वाहनचालकांच्या भोजनाचा प्रश्न आहे.

गांधीबाग, इतवारा येथे सुरत, बंगळुरू, दिल्ली, कोलकाता येथून मोठय़ा संख्येने मोठे १६,२०,२६ चाकी ट्रक जीवनावश्यक वस्तू घेऊन येतात. मात्र गेल्या आठ दिवसांपासून ट्रकची संख्या रोडावली असून काही राज्यातील ट्रक येणे बंद झाले आहे. बाजारात येणारा माल हा छोटय़ा गाडय़ांनी येत असल्याने काही प्रमाणात मालाची आवक सुरू आहे.

– कुक्कू मारवाह, अध्यक्ष नागपूर ट्रकर्स युनिटी