अकोला: राज्यात ‘सीसीआय’कडून हमीभावावर कापूस खरेदी केली जात आहे. अद्याप सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला उत्पादित माल विकला नाही. त्यातच ‘सीसीआय’कडून अंतिम मुदत २७ फेब्रुवारी देण्यात आली होती. मुदतवाढ देण्याची मागणी भाजपचे मुख्य प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांनी देखील केंद्र शासनाकडे पत्र पाठवले होते. पणन विभागाने कापूस खरेदी मुदत वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला. या मागणीचा सकारात्मक विचार करून केंद्र सरकारने राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत कापूस खरेदीसाठीची मुदत १५ मार्चपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात भारतीय कपास निगम लि. (सीसीआय) कडून शासन आधारभूत किंमती अंतर्गत कापूस हंगाम सन २०२५-२६ मधील उत्पादित कापूस खरेदी सुरू आहे. खरेदीसाठी ‘सीसीआय’कडून अंतिम मुदत २७ फेब्रुवारी निश्चित करण्यात आली होती. ती संपुष्टात आल्याने खरेदी योजनेला किमान एप्रिल २०२६ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे मुदतवाढ देण्यासाठी पत्र पाठवले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून अद्यापही कापसाची पूर्ण विक्री करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांकडे विक्रीअभावी कापूस मोठ्या प्रमाणात पडून आहे. ‘सीसीआय’कडून कापूस खरेदी बंद झाल्यास खुल्या बाजारातील कापसाचे दर प्रचंड प्रमाणात कोसळल्यास शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होईल, अशी शक्यता आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केली होती.
‘सीसीआय’कडून शासन आधारभूत किंमतीत सुरू असलेली कापूस खरेदी प्रक्रिया किमान एप्रिल २०२६ अखेरपर्यंत सुरू ठेवण्यासाठी शासनस्तरावरुन भारतीय कपास निगम लि. (सीसीआय) तसेच केंद्र शासनाकडे तातडीने प्रयत्न करण्यात यावेत, अशी मागणी देखील आमदार सावरकर यांनी केली होती.
राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीचा रेटा लक्षात घेता केंद्र सरकारने राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून कापूस खरेदीसाठीची मुदत १५ मार्चपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. आता या मुदतीत सर्व कापूस खरेदीची प्रक्रिया पूर्ण होणार की आणखी मुदतवाढ मागितली जाणार, याकडे लक्ष राहणार आहे.
हरभरा उत्पादकांनाही दिलासा; खरेदीसाठी नोंदणी सुरू
राज्य शासनामार्फत हरभरा खरेदी प्रक्रिया देखील १ मार्च २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे. शेतकरी नोंदणी केली जाणार आहे. ५८७५ रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने हरभरा खरेदी सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती पणन विभागाकडून देण्यात आली आहे.
