अकोला : ‘सीसीआय’द्वारे नोंदणीकृत केंद्रावर हमीभावावर शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केला जाणार आहे. मात्र, ‘सीसीआय’च्या एका अटीमुळे शेतकऱ्यांची कोंडी झाल्याचे चित्र आहे. कापूस उत्पादन सरासरी किमान ८ क्विंटल असताना ‘सीसीआय’ने एकरी ५.६० क्विंटल कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच अडचण होत असून उर्वरित कापसाचे काय? असा प्रश्न कापूस उत्पादक शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. यासंदर्भात शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मर्यादा हटवण्याची मागणी केली आहे.

भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत शासकीय कापूस खरेदी सुरू करण्यात येत आहे. या खरेदी प्रक्रियेंतर्गत ‘सीसीआय’ने प्रत्येक शेतकऱ्याकडून प्रतिएकर केवळ पाच क्विंटल ६० किलो कापूस खरेदी करण्याची अट घातली. ही मर्यादा अत्यंत अव्यवहार्य आणि शेतकऱ्यांसाठी गैरसोयीची ठरत आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे कापसाचे प्रतिएकर उत्पादन ५.६० क्विंटलपेक्षा कितीतरी अधिक आहे. मर्यादेमुळे शेतकऱ्यांना कापूस विकण्यासाठी खरेदी केंद्रावर अनेक फेऱ्या माराव्या लागतात. वारंवार फेऱ्या मारल्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाढेल व त्यांचा वेळ वाया जाईल. आर्थिक भारही पडेल. सरकारच्या वायदेबंदी, निर्यात बंदी, अनावश्यक आयाती यासारख्या हस्तक्षेपामुळे खुल्या बाजारातील कापसाचे भाव पडलेले असताना ‘सीसीआय’च्या अटीमुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.

अतिवृष्टीमुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस खरेदी करणे ही सरकारची जबाबदारी ठरते. ‘सीसीआय’च्या अटीमुळे खरेदी केंद्रावर अनावश्यक गर्दी होण्याची व खरेदी प्रक्रिया मंदावण्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कापूस खरेदी प्रक्रिया अधिक सुरळीत करण्यासाठी ‘सीसीआय’ने कापूस खरेदीची प्रतिएकरी पाच क्विंटल ६० किलोची मर्यादा तत्काळ हटवावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट, समाज माध्यम प्रमुख विलास ताथोड, युवा आघाडी विदर्भ प्रमुख डॉ. नीलेश पाटील, शेतकरी संघटना सदस्य राहुल बहाळे, सतीश सरोदे, गजानन चौधरी आदी उपस्थित होते.

कापूस उत्पादकांची आधीच नोंदणी

‘सीसीआय’द्वारे हमीभावावर कापूस खरेदीसाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आधीच ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे. या नोंदणीच्यावेळी कापूस खरेदीची मर्यादा देण्यात आली नव्हती. आता मर्यादा लादल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत असल्याचे शेतकरी संघटनेचे विलास ताथोड यांनी सांगितले.