लोकसत्ता टीम

नागपूर : विस्तारीत बुटीबोरीत देशातील पहिली लिथियम रिफायनरी आणि बॅटरी उत्पादन कारखाना वर्धान लिथियम प्रा. लि. उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ४२,५३२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून यामुळे भारत ऊर्जा संसाधनांमध्ये आत्मनिर्भर होईल, असा दावा केला जात आहे.

वर्धान लिथियम (आय) प्रा. लि.चे अध्यक्ष सुनील जोशी आणि व्यवस्थापकीय संचालक वेदांश जोशी यांनी या उपक्रमाची घोषणा केली. बुटीबोरी येथे ५०० एकरात हा प्रकल्प होणार असून येथे ६० हजार टन लिथियमची वार्षिक रिफायनिंग आणि २० गिगावॅट क्षमतेची बॅटरी उत्पादन होणार आहे, असे कंपनीचे दावे आहेत.

‘मेक इन इंडिया’साठी एक गेम-चेंजर

केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाशीसंबंधित हा प्रकल्प आहे. तो भारताच्या वाढत्या लिथियम आधारित उत्पादनांची मागणी पूर्ण करेल. भारताचे आयातीवर अवलंबत्व कमी करून, हा प्रकल्प भारताला ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने पुढे नेणार असे कंपनीचे म्हणणे आहे.

अमेरिका आणि युरोपमधील तंत्रज्ञान भागीदारांच्या सहकार्याने वर्धान लिथियम कंपनी नागपूरमध्ये सर्वात उच्च आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादने तयार करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पास राज्यात आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली यासंदर्भातील करार स्वीत्झर्लंडमधील दावोस येथे झाला आहे. या प्रकल्पाच्या स्थापनामुळे हजारो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील,असा दावा कंपनीने केला आहे.

Story img Loader