नागपूर : राज्य शासनाने आमच्याविरुद्ध प्रशासकीय व पोलीस यंत्रणेचा कितीही वापर केला तरी न्यायालय आमच्यासाठी आहे, तेथून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांनी शुक्रवारी केल़े  विशिष्ट पक्षाच्या नेत्यांना अटकेपासून दिलासा व सुरक्षा मिळत असल्याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असतानाच कुटे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आह़े

तीर्थक्षेत्र शेगाव येथील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावर आमदार कुटे यांनी पत्रकार परिषद घेतली. पोलीसच शेगाव शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘‘पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करावे, अन्य भानगडीत पडू नये. राज्य शासनाने आमच्याविरोधात कितीही प्रशासन, पोलीस यंत्रणा वापरल्या तरी न्यायालय आमच्यासाठी आहे, तेथे आम्हाला हमखास न्याय मिळतो, तेथून आम्हाला काय- काय करवून घ्यायचे ते भविष्यात करूच’’ असेही ते म्हणाले.   

विशेष म्हणजे, गुरुवारीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नाव न घेता ठराविक राजकीय पक्षाच्या नेत्यांनाच न्यायालयाकडून दिलासा कसा मिळतो, असा सवाल केला होता.  काही विशिष्ट पक्षाच्या लोकांना सातत्याने न्यायव्यवस्थेकडून दिलासा मिळत असल्याने शंका तर उपस्थित होणारच, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले होत़े  त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कुटे यांनी हे वक्तव्य केल्याने याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

आमदार कुटे हे पश्चिम विदर्भातील भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून ओळखले जातात. ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू आमदारांपैकी एक आहेत. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीही होते. त्यामुळे कुटे यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास

 माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. महाराष्ट्रात भाजप कार्यकर्ते आणि आमच्याशी संबंधित संघटनांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. शेगावमध्ये तेच घडले. त्यासंदर्भात बोलताना, कितीही खोटे गुन्हे दाखल झाले, तरी न्यायदेवता सर्वोच्च आहे आणि आम्ही खरे असल्याने न्यायालयात आम्हाला दिलासा मिळतो, असे मी म्हटले होते, असे स्पष्टीकरण  आमदार डॉ.संजय कुटे यांनी दिले.