० ३७५ कलमाची वाढ; ३० मेपर्यंत पोलीस कोठडी
अकोला : शहरातील चौधरी कोचिंग क्लासचा संचालक वसीम चौधरी याने अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणाच्या गुन्ह्याची व्याप्ती वाढली आहे. पोलिसांनी आता आरोपीवरील गुन्ह्यात भादंवि ३७५ क कलमाची वाढ केली. आरोपीची पोलीस कोठडी संपल्याने त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी वसीम चौधरी याला ३० मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षकी पेक्षाला काळिमा फासणाऱ्या या घटनेला गंभीर वळण प्राप्त झाले आहे. वसीम चौधरी याच्या शिकवणी वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलीसोबत मोबाइलवरून चॅटिंग करणे, खोलीवर बोलावून अश्लील चाळे केल्याप्रकरणी वसीम चौधरीविरुद्ध भादंविचे कलम ३५४ (अ, ब, ड) विनयभंग करणे, पोस्कोच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी वसीम चौधरी पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्याचा तपास सिव्हिल लाईन पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस करीत आहेत. या प्रकरणांत वसीम चौधरी याच्यावर दाखल गुन्ह्यात बलात्काराच्या गंभीर कलमाची वाढ पोलिसांनी केली आहे. ३७५ क कलम गुन्ह्यात वाढवण्यात आले. पोलीस कोठडीतील चौकशीत आणखी काही गंभीर बाबी समोर येण्याची शक्यता आहे. वसीम चौधरी याच्यापुढील अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.