राज्यात १ जून ते १६ जून दरम्यान ३५ हजार ५३० नवीन करोनाग्रस्त आढळले. परंतु या काळात केवळ २० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाच्या अहवालातून पुढे आले आहे.

१ जून ते १६ जूनपर्यंत राज्यात ३५ हजार ५३० नवीन रुग्ण आढळले. त्या तुलनेत २० मृत्यू झाले. रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे हे प्रमाण केवळ ०.०५ टक्केच आहे. या काळात १८ हजार ९०८ व्यक्ती करोनामुक्त झाले. दरम्यान, राज्यात करोनाचा पहिला रुग्ण आढळलेल्या मार्च २०२० ते १६ जून २०२२ पर्यंत ७९ लाख २३ हजार ६९७ रुग्णांची नोंद झाली. त्यातील १ लाख ४७ हजार ८८० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे या काळातील रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण १.८६ टक्के असे जास्त होते. त्यातच करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण जास्त होते. तिसऱ्या लाटेत हे प्रमाण खाली आले. आता तर मृत्यूचे प्रमाण अत्यल्प दिसत आहे. या आकडेवारीला सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्येत पाचपट वाढ –

राज्यात १ जून २०२२ रोजी अ‍ॅक्टीव्ह (उपचाराधीन) रुग्णसंख्या ४ हजार ३२ होती. ही रुग्णसंख्या १६ जून २०२२ रोजी पाच पटीने वाढून २० हजार ६३५ रुग्ण इतकी नोंदवली गेली.