राम भाकरे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : गुरांमध्ये झपाटय़ाने पसरणाऱ्या ‘लम्पी’ रोगाची साथ आटोक्यात आणण्यासाठी सरकारी यंत्रणा धडपडत असतानाच नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील ‘गो-विज्ञान अनुसंधान केंद्रा’च्या शास्त्रज्ञांनी मात्र लम्पीबाधित गुरांना गोमूत्र पाजून रोगमुक्त केले जाऊ शकते, असा दावा केला आहे.

‘लम्पी’चा संसर्ग न झालेल्या गुरांचे मूत्र बाधित जनावरांना पाजून त्यांची प्रतिकारशक्ती वाढवली जाते. त्यातून देवलापार येथीलच नव्हे, तर विदर्भाच्या अनेक भागांतील गुरे ‘लम्पी’मुक्त झाली, असा दावा या केंद्राने केला आहे. ‘लम्पी’ची साथ रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर हा दावा महत्त्वाचा ठरतो.

याबाबत केंद्रातील वैद्य नंदिनी भोजराज म्हणाल्या, ‘‘लम्पी आजार गुरांसाठी जास्त धोकादायक आहे. त्यावर उपाय म्हणून आम्ही गोमूत्राचा जास्तीत जास्त वापर केला. यामुळे गुरांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. याशिवाय गुळवेल, हळद, अर्जुन (आजन), अडुळसा आणि कडुलिंब या वनस्पतींचे मिश्रण करून जनावरांना दिले. त्यांचा फायदा बाधित जनावरांना झाल्याचे आमच्या निदर्शनास आले.’’ गोठय़ात रात्री कडुलिंब आणि शेणाचा धूर केल्यास कीटक नष्ट होतात. गोठे किंवा गुरे बांधण्याची जागा स्वच्छ ठेवली तर त्यांना असे आजार होणार नाहीत, असेही भोजराज यांनी सांगितले.

कोणताही रोग बरा होऊ शकतो

गोमूत्रात आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, खनिज मिश्रणे, कारबॉनिक, अ‍ॅसिड, पोटॅश, नायट्रोजन, अमोनिया, मँगनीज, सल्फर, फॉस्फेट, पोटॅशियम, युरिया, युरिक अ‍ॅसिड, एन्झाइम्स, सिटोकिन्स, लॅक्टोज आदी द्रव्ये असतात. सिलोकिन्स आणि अ‍ॅमिनो अ‍ॅसिड हे रोगप्रतिबंधक म्हणून भूमिका बजावतात. गोमूत्रापासून तयार मिश्रणे कोणताही रोग बरा करू शकतात, असा दावा ‘गो विज्ञान केंद्रा’ने केला आहे.

राज्यात ४७.३० लाख गुरांचे लसीकरण

राज्यात २४ सप्टेंबपर्यंत २१,९४८ गुरांना लम्पीची लागण झाली आहे. त्यापैकी ८०५६ उपचाराने बरी झाली. एकूण ४७.३० लाख गुरांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

उपचार असे केले..

देवलापार येथे ६५० गुरे आहेत. त्यातील २० ते २२ गुरांना ‘लम्पी’ची लक्षणे होती. ती आता रोगमुक्त झाली आहेत. लम्पीची लक्षणे असलेल्या गुरांना १०० मि.लि. तर वासरांना ५० मि.लि. गोमूत्र उकळून पाजण्यात आले, अशी माहिती वैद्य नंदिनी भोजराज यांनी दिली. 

लम्पीबाधित गुरांना गोमूत्र पाजल्यामुळे आणि आयुर्वेदिक उपचार केल्यामुळे ती रोगमुक्त झाली. गोमूत्रातील अ‍ॅन्टी ऑक्साइड परिणामकारक ठरतात, असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर हरियाणा, राजस्थान या राज्यांतसुद्धा गोमूत्राचा उपयोग केला जातो.

 सुनील मानसिंहका, संयोजक, गो-विज्ञान अनुसंधान केंद्र

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cow urine treat lumpy skin disease claim of scientists of cow science center in nagpur district zws
First published on: 27-09-2022 at 05:02 IST