नागपूर : घर खरेदीच्या व्यवहारातून लुंबिनी नगरात कोयत्याने हल्ला करत मंगेश भीमराव भिमटे (४५) यांचा खून करणाऱ्या मारेकऱ्यांमधील सह आरोपी आशिष उर्फ बोंड्या यादवराव चौधरी अखेर बुधवारी गुन्हे शाखा पथक पाचच्या हाती लागला.
गेल्या महिन्याभरापासून फरार बोंड्या हा मिठानिम दर्गाह परिसरात फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. भिमटे खून प्रकरणात सह आरोपी असलेला बोंड्या पोलिसांना हवा होता. त्यामुळे सुगावा मिळताच पोलिसांनी चोहोबाजूंनी घेरा टाकत त्याला ताब्यात घेतले.
घराच्या विक्रीमुळे संतप्त कुणाल उर्फ गोलू विद्याधर कांबळे आणि त्याचा सहकारी आशिष चौधरी या दोघांनी ९ जानेवारीला लुंबिनी नगरात मध्यरात्री भिमटे कुटुंबावर हल्ला चढवला. कोयत्याचा वर्मी लागलेला वार मंगेश यांना जीवघेणा ठरला, तर त्यांचे वडील भीमराव भिमटे हेही या झटापटीत जखमी झाले. घटनेनंतर कोयता हातात घेऊन गोलूने तब्बल पाऊण तास परिसरात दहशत पसरवली होती. ‘
मध्ये आलात तर चिरून काढीन,’ अशी धमकी देत कुणाल आणि आशिषने नागरिकांच्या दिशेने धावत असल्याने संपूर्ण लुंबिनी नगरात भीतीचे वातावरण पसरवले होते. नागरिक घरातच कोंडून बसले. अखेर गंभीर जखमी अवस्थेत मंगेश भिमटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत मूख्य मारेकरी गोलू कांबळेला २४ तासांच्या आत अटक केली होती. मात्र गुन्हा घडल्याच्या ९ जानेवारीपासून सह मारेकरी बोंड्या हा फरार होता. पोलीस त्याच्या मागावरच होते.
तब्बल पाऊण तास कोयत्याची दहशत
हातात कोयता उगारून कुणाल उर्फ गोलूने तब्बल पाऊण तास लुंबिनी नगरात अक्षरशः हैदोस घातला. खबरदार मध्ये पडाल तर एकेकाला चिरून काढेल, असे जोरजोरात ओरडत तो भिमटे कुटुंबावर कोयता घेऊन धावत होता. त्याच्या या दहशतीमुळे परिसरातील नागरिक घरातच दबा धरून बसले. अखेर त्याने कोयत्याने केलेल्या हल्लात गंभीर जखमी मंगेश भिमटे यांचा मृत्यू झाल्याने पोलिसांच्या धाकावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लागले आहे.

