यवतमाळ : जिल्ह्यात अवैध शस्त्रसाठ्याच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन ठिकाणी छापे टाकून दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पाच अग्निशस्त्रे, धारदार तलवार, ३५० जिवंत काडतुसे, बुलेटप्रूफ जॅकेटसह एकूण १२ लाख ८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवायांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पहिल्या घटनेत रणवीर वर्मा (३०, रा. दर्डा नगर, यवतमाळ) हा पांढरकवडा रोडने मोपेडने जात असताना पोलिसांनी त्याला अडवून झडती घेतली. त्याच्याकडील पोत्यात पाच अग्निशस्त्रे, ३५० जिवंत काडतुसे, एक तलवार, बुलेटप्रूफ जॅकेट व इतर साहित्य आढळून आले.

या कारवाईत सात लाख ७८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. रणवीर याने ही शस्त्रे कामरान अहमद (रा. देहरादून, उत्तराखंड) याच्याकडून खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. कामरान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात दिल्लीसह विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

दुसऱ्या घटनेत मो. अश्फार उर्फ भाया (३५, रा. तेलीपुरा, यवतमाळ) हा चारचाकी वाहनात पंप अ‍ॅक्शन गन घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नागपूर-तुळजापूर महामार्गावर सापळा रचून त्याला अटक केली. वाहनाच्या डिकीतून पंप अ‍ॅक्शन गन व ५ जिवंत काडतुसे सापडली. या कारवाईत ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अवधुतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात पहिल्यांदाच इतके शस्त्र आदळल्याने पोलिसही अवाक झाले. या प्रकरणात आरोपींचा कुठे घातपात करण्याची तयारी होती की, टोळीयुद्ध किंवा हे शस्त्र विक्रीसाठी आणले होते, याबाबत तपास सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी हा सध्या चिंतेचा विषय झाला आहे. जिल्ह्यात दर एक दिवसाआड खुनाच्या घटना घडत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदर कारवाया पोलीस अधीक्षक कुमार चिता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, पो.नि. सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष मनवर, अंमलदार निलेश राठोड, रितुराज मेडवे, प्रशांत हेडाऊ, सचिन घुगे, आकाश सहारे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.