नागपूर : राजाचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा गृह जिल्हा असलेल्या उपराजधानीत गुन्हेगारीला ऊत आला आहे. शहर पोलीस दलाच्या परमंडळ १ मधून गुन्हेगारांच्या १५ टोळ्यांमधील १२० गुंडांना पोलिसांनी शहराच्या सीमेतून हद्दपार केले. या शिवाय पोलिसांनी ५ सराईत संघटीत गुन्हेगारांनाही १ वर्षासाठी स्थानबद्ध करीत त्यांची वेगवेगळ्या कारागृहात रवानगी केली.

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी विविध वसाहतींमध्ये दहशत पसरविणाऱ्या १२० गुन्हेगारांना २ वर्षांसाठी शहर आणि ग्रामीणमधून हद्दपार केले. पोलीसांनी चोरीच्या १५४ घटनांचा छडा लावत चोरट्यांना जेरबंद केले. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत परिमंडळ १ मध्ये खूनाच्या ४ घटना घडल्या. तर ३ जणांवर प्राणघातक हल्ले झाले. अपहरणाच्या २३ घटना या कालावधीत उघडकीस आल्या. घरफोडीच्या ४८ प्रकरणांचाही तपास करीत पोलिसांनी दरोडेखोरांवर अंकूश लावला.

१०८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

सण, उत्सव, महापुरुषांच्या जयंतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न गुन्हेगारी टोळ्यांकडून होतो. शहरातील शांतता भंग होऊन त्यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असते. ती पाहता परिमंडळ १ ने सण- उत्सव काळात १०८ गुंडावर प्रतिबंधात्मक कारवाई करीत त्यांना अटक केली. गुन्हेगारांवर अंकूश ठेवण्यासाठी कायद्यात केलेल्या तरतूदीनुसार पोलीस उपायुक्तांच्या अधिकारांत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार परिमंडळ १ ने ७४ जणांवर कायदेशीर कारवाई करीत त्यांना सामाजिक शांतता भंग केल्या प्रकरणी ताब्यात घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्यवर्ती भागात महिला असुरक्षित

सहा महिन्यांच्या कालावधीत परिमंडळ १ च्या हद्दीतील वाडी, हिंगणा औद्योगिक वसाहत परिसर, प्रतापनगर, बजाजनगर, सोनेगाव परिसरात महिला अत्याचाराच्या १८ घडना घडल्या. या गुन्हेगारांनाही पोलिसांनी तक्रारीनंतर अवघ्या काही तासांत अटक केली.