फरारांची यादी सादर, गुन्ह्य़ांच्या स्वरूपाविषयी चर्चा

एका राज्यात गुन्हा करून दुसऱ्या राज्यात निघून जाणाऱ्या गुन्हेगारांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असते. मात्र, अनेकदा राज्या-राज्यातील पोलिसांमध्ये समन्वय नसल्याने असे गुन्हेगार अनेकवर्षे मोकाट फिरतात. अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी नागपूर पोलिसांच्या पुढाकाराने आंतरराज्यीय परिषद नागपुरात पार पडली. यात विविध राज्यांतील हजारो गुन्हेगारांच्या माहितीचे आदानप्रदान करण्यात आले.

नागपूरसह विदर्भात मध्यप्रदेश, छत्तीसगढ येथील गुन्हेगार नेहमी दोन राज्यांमधील सीमेचा फायदा घेऊन लपून बसतात. पोलीस त्या ठिकाणच्या स्थानिक पोलिसांशी संपर्क करतात. मात्र, त्यांच्याकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. शिवाय वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यापासून अनभिज्ञ असतात. त्यामुळे नागपूर पोलीस आयुक्तालयातर्फे सोमवारी ए-कॉप्स एक्सलंस येथे एकदिवसीय आंतरराज्यीय परिषद घेण्यात आली.

परिषदेला नागपूर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, मध्यप्रदेश सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैलाश मकवाना, महाराष्ट्र सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल, सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, नागपूर परीक्षेत्राचे महानिरीक्षक प्रतापसिंग पाटणकर प्रामुख्याने उपस्थित होते.

याशिवाय मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या अधिकाऱ्यांसह विदर्भातील अनेक अधिकारी उपस्थित होते. यावेळी नागपूर आणि विदर्भातील गुन्हेगार, गुन्हेगारीचे स्वरूप आदींची चर्चा करण्यात आली. नागपूर पोलिसांनी मध्यप्रदेश पोलिसांना हव्या असलेल्या ५५३ गुन्हेगारांची यादी सादर केली. त्याशिवाय विदर्भातील प्रत्येक जिल्हा अधीक्षकांनी त्याच्या क्षेत्रातील मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या अधिकाऱ्यांना यादी सादर केली, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी यावेळी दिली.

शस्त्रांच्या तस्करीवर विशेष लक्ष

मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर, खंडवा, चंबल या भागात मोठय़ा प्रमाणात शस्त्रांची निर्मिती होते. तेथून महाराष्ट्रात शस्त्रांची तस्करी होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहे. मध्यप्रदेश पोलिसांनी त्या ठिकाणी अनेकदा कारवाई केली. एका कारवाईत तर ५५० शस्त्रे पकडण्यात आली होती. भविष्यात आता आंतरराज्यीय गुन्हेगारांना अटक करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात येईल, अशी माहिती मध्यप्रदेश सीआयडी प्रमुख मकवाना यांनी दिली.

मानवी तस्करीचेही प्रमाण मोठे

मध्यप्रदेशातून मोठय़ा प्रमाणात मानवी तस्करी होते. मध्यप्रदेश पोलिसांच्या आकडेवारीनुसार गेल्या काही वर्षांमध्ये ५ हजार अल्पवयीन मुलामुलींची तस्करी करण्यात आली. त्यापैकी अनेक मुली नागपुरात गंगाजमुनात सापडल्या. या कारवाईत अनेकांना अटकही करण्यात आली. त्यादृष्टीने काम करण्यासंदर्भात परिषदेत चर्चा करण्यात आली, असेही ते म्हणाले.