scorecardresearch

मंत्रालयातील संत गाडगेबाबांची ‘दशसूत्री’ हटवल्यामुळे समाजमाध्यमातून रोष; यवतमाळचे सामाजिक कार्यकर्ते संतोष अरसोड यांचे पत्र सार्वत्रिक

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संत गाडगेबाबा यांची शिकवण असलेल्या ‘दशसुत्री’चा फलक लावला होता. नव्या सरकारने हा फलकच काढून टाकल्याने संत गाडगेबाबांच्या अनुयायांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

मंत्रालयातील संत गाडगेबाबांची ‘दशसूत्री’ हटवल्यामुळे समाजमाध्यमातून रोष; यवतमाळचे सामाजिक कार्यकर्ते संतोष अरसोड यांचे पत्र सार्वत्रिक
संत गाडगेबाबांची ‘दशसूत्री

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरील संत गाडगेबाबा यांची ‘दशसूत्री’ असलेला फलक हटवल्याबाबत समाजमाध्यमातून रोष व्यक्त केला जात आहे. नेर येथील शेतकरी आंदोलक, सामाजिक कार्यकर्ते संतोष अरसोड यांचे याबाबतचे पत्र समाज माध्यमांवर सार्वत्रिक झाले आहे. सरकारच्या या कृतीबद्दल सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

हेही वाचा- गाडगेबाबांची दशसूत्री शिंदे-फडणवीस सरकारसाठी अडचणीची का ठरावी ?

‘समाजमान्य समाजश्री वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांना महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेचा अनंत कोटी नमस्कार, पत्रास कारण की, तुम्ही जिवंतपणी घरादाराची राख रांगोळी करून समाजावर प्रकाश फुले उधळलीत. तुम्ही केलेल्या प्रबोधनाने हा महाराष्ट्र सुंदर झाला…’ अशी सुरूवात करून अरसोड यांनी थेट गाडगेबाबांना पत्र लिहून नवीन सरकारने मंत्रालयातील त्यांची दशसुत्री हटविल्याबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर १२ मार्च २०२० रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संत गाडगेबाबा यांची शिकवण असलेल्या ‘दशसुत्री’चा फलक लावला होता. नव्या सरकारने हा फलकच काढून टाकल्याने संत गाडगेबाबांच्या अनुयायांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर प्रबोधन करून रचनात्मक काम उभे केले. प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांचे रोखठोक चरित्र लिहिले, त्या पुस्तकासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी मुखपृष्ठ काढले होते. त्यामुळे ठाकरे कुटुंबाशी संत गाडगेबाबा यांची नाळ जुळली होती. या वैचारिक बांधिलकीतूनच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर संत गाडगेबाबा यांची दशसुत्री लावण्यात येईल, असे आश्वासन नागपूर येथे दिले व ही दशसूत्री त्यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर लावलीसुद्धा. त्यावर मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांची स्वाक्षरीसुद्धा होती. नेमकी हीच स्वाक्षरी नव्या सरकारला बोचत असावी आणि त्यामुळेच हा फलक हटवल्याची चर्चा आहे.

हेही वाचा- गाडगेबाबांच्‍या दशसूत्रीचे शिंदे-फडणवीस सरकारला वावडे

ही दशसुत्री पूर्वीप्रमाणे होती त्या ठिकाणी लावण्यात यावी, असा सूर समाजमाध्यमांतून उमटतो आहे. काही संघटनांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली आहे. ज्या अमरावती जिल्ह्यात संत गाडगेबाबा यांचा जन्म झाला त्या अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. असे असताना हा प्रकार व्हावा, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. हा दशसुत्रीचा फलक पूर्ववत लावून संत गाडगेबाबांच्या विचारांशी प्रामाणिक आहोत हे सरकारने दाखवून द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सरकारचे नैतिक बळ हरवले – संतोष अरसोड

संत गाडगेबाबा यांनी सांगितलेला विचार महाराष्ट्राचा श्वास आहे. दशसुत्री हटवून हा श्वास रोखून धरण्याचा हा अश्लाघ्य प्रकार आहे. बाबांनी सांगितलेल्या दशसुत्रीनुसार वागताना नैतिक बळ आवश्यक असते. सरकारचे हे नैतिक बळ हरवले आहे म्हणूनच हा फलक हटवला असावा. संत गाडगेबाबा यांनी दिलेल्या वैचारिक अधिष्ठानावर घातलेला हा घाला आहे, असे संतोष अरसोड म्हणाले.

हेही वाचा- वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निमित्ताने मुंडे बंधु-भगिनीत राजकीय चकमक

संभाजी ब्रिगेडचे उद्या उपवास आंदोलन

उद्या, रविवारी २ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपवास करून गांधी मार्गाने सरकारचा निषेध करणार आहे. महात्मा गांधी आणि गाडगेबाबांचा निकटचा संबंध होता. सेवाग्राम आश्रमात गांधीजींनी ‘आप जैसा साधू देखा नही’, असे गौरवोद्गार गाडगेबाबांविषयी काढले होते, याची आठवणही संभाजी ब्रिगेडने करून दिली आहे. सरकारने ही दशसूत्री पुन्हा मंत्रालयाच्या प्रवेशव्दारावर लावली नाही तर संभाजी ब्रिगेड नेहमीच्या पद्धतीने आक्रमक आंदोलन करेल, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, प्रवक्ते गंगाधर बनबरे व प्रेमकुमार बोके यांनी जाहीर केले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या