scorecardresearch

चंद्रपूर : राष्ट्रध्वज विक्रीतून कोट्यवधींची कमाई ; चंद्रपूर जिल्ह्यात २ लाख ९४ हजार राष्ट्रध्वजांची विक्री

दोन लाख ४० हजार घरांची संख्या असलेल्या जिल्ह्यात ‘घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत ४ लाख ५० हजार तिरंगा ध्वज विक्रीचे लक्ष देण्यात आले होते.

चंद्रपूर : राष्ट्रध्वज विक्रीतून कोट्यवधींची कमाई ; चंद्रपूर जिल्ह्यात २ लाख ९४ हजार राष्ट्रध्वजांची विक्री
( संग्रहित छायचित्र )

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘घरोघरी तिरंगा’ अभियानासाठी जिल्ह्याला साडेचार लाख ध्वज विक्रीचे लक्ष्य असताना २ लाख ९४ हजार राष्ट्रध्वजांची विक्री झाली. २० रुपयांपासून तर २५, ३० व ३५ रुपयाला एक या दराने राष्ट्रध्वजाची विक्री झाली. यातून ६ ते ७ कोटींपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळाले. सर्वाधिक २ लाख १५ हजारा राष्ट्रध्वजांची विक्री महिला बचत गट व ग्राम पंचायतींच्या माध्यमातून झाली.

दोन लाख ४० हजार घरांची संख्या असलेल्या जिल्ह्यात ‘घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत ४ लाख ५० हजार तिरंगा ध्वज विक्रीचे लक्ष देण्यात आले होते. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी तसे नियोजनदेखील केले होते. विक्रीच्या दृष्टीने साडेचार लाख ध्वज मागविण्यात आले. तसेच स्थानिक उद्योगांनी ५५ हजार ध्वज दिले. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी १ लाख २० हजार ध्वज मोफत वाटप केले. जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात २ लाख ९४ हजार तिरंगा ध्वजांची विक्री करण्यात आली. एका ध्वजाची किंमत २० रुपये याप्रमाणे २ लाख ९४ हजार ध्वज विक्रीतून ६ ते ७ कोटींचे उत्पन्न झाले. नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, महिला बचत गट, महानगरपालिका, शाळांमधून ध्वज विक्री करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक २ लाख १५ हजार ध्वजांची विक्री ग्राम पंचायत तथा महिला बचत गटाच्या माध्यमातून झाली आहे. १ लाख ५६ हजार ध्वज शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या ध्वजांचे काय करणार असा प्रश्न आता प्रशासनासमोर आहे.
महापालिकेने शहरातील डॉक्टर, कंत्राटदार, शाळा, विविध संस्था यांना झेंडे विक्रीचे लक्ष्य दिले होते. महापालिका क्षेत्रातील डॉक्टरांना तर राष्ट्रध्वज विकत घेणे सक्तीचे करण्यात आले होते. डॉक्टर तथा त्यांच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आयएमए सभागृहात २५ रुपये प्रति ध्वज विक्री केला जाईल, असे संदेश डॉक्टरांच्या मोबाईलवर पाठविण्यात आले. राष्ट्रध्वज खरेदीची सक्ती त्यांच्यावर करण्यात आली. काही भागात शिक्षकांनाही ही कामे सोपविण्यात आली आहे.

दर्जाबाबत असंख्य तक्रारी

शहरी व ग्रामीण भागात निकृष्ट दर्जाचा तिरंगा ध्वज मिळाल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. पहिल्या टप्प्यात महापालिकेला मिळालेल्या ध्वजांपैकी ८० टक्के ध्वज निकृष्ट होते. तिरंगा ध्वजावरील अशोक चक्र दोन्ही बाजूंनी छापल्या गेले नव्हते, छपाई अतिशय निकृष्ट होती, लांबी रुंदी योग्य नव्हती. त्यामुळे ते ध्वज परत पाठविण्यात आले. त्यानंतर अमरावती येथून ध्वज मागविण्यात आले. त्यातील काही ध्वजांचा दर्जाही निकृष्ट आहे. तालुका स्तरावर तसेच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात अशाच तक्रारी आल्या आहेत. जिल्ह्यात साडेचार लाख ध्वज लावण्यात येणार आहेत.
अमृत महोत्सवासाठी स्वतंत्र निधी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर तहसीलदारांना ५ लाख व संवर्ग विकास अधिकारी यांना ५ लाखाचा निधी देण्यात आला आहे. या निधीतून प्रचार, प्रसिध्दीपासून तर सर्व कार्यक्रमांची आखणी करायची आहे. जिल्ह्याला जवळपास दीड कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. याच निधीतील दहा टक्के रक्कम जिल्हास्तरावर खर्च करायची आहे अशीही माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या