scorecardresearch

तलाव, उद्यानात अल्पवयीन मुला-मुलींची गर्दी वाढतेय!

इच्छा असूनही पालक मुलांच्या हातून मोबाईल काढून घेऊ शकत नाही.

शालेय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय; पालक मात्र अनभिज्ञ

नागपूर : सध्या शहरातील बहुतांश उद्याने आणि तलावाच्या ठिकाणी फिरणाऱ्यांमध्ये १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींची संख्या वाढली आहे. शालेय गणवेश परिधान करून, पाठीवर शाळेचे दप्तर घेऊन ही मुले फिरताना दिसतात. विशेष म्हणजे, अनेक पालक या प्रकाराबाबत अनभिज्ञ असतात.

ऑनलाईन शाळांमुळे मुला-मुलींच्या हाती स्मार्टफोन आले. इंटरनेटचा वापर वाढला. इच्छा असूनही पालक मुलांच्या हातून मोबाईल काढून घेऊ शकत नाही. त्यामुळे मोबाईलचा अतिवापर सुरू झाला. त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन  अल्पवयीन मुले-मुली प्रेमात पडू लागली, अशी मुले आता उद्याने  आणि शहरातील तलावांवर गर्दी करीत असल्याचे चित्र आहे.

‘लोकसत्ता’ने फुटाळा, अंबाझरी आणि काही उद्यानांना भेटी दिल्या असता अल्पवयीन मुले-मुली हातात हात घालून फिरताना तर काही कोपऱ्यात बसलेले दिसून आले. यापैकी काही मुलींनी  शालेय गणवेश परिधान  केला होता. त्यांच्या पाठीवर शाळेचे दप्तरही होते. दुसरीकडे अल्पवयीन प्रेमीयुगुलांमध्ये जंगल भ्रमंतीचा ज्वर वाढत आहे. काही जण शहराबाहेर महामार्गावर झाडाखाली तासनतास गप्पा मारताना दिसतात.

ज्येष्ठ नागरिक, महिलांना त्रास

सायंकाळी जेष्ठ नागरिक, महिला, मुले खेळण्यासाठी व्यायामासाठी उद्यानात येत असतात. अनेकदा प्रेमीयुगुलांमुळे त्यांची अडचण होते. जेष्ठ नागरिकांचाही नाईलाज होतो. आक्षेप घेतल्यानंतर वादही होत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत.

दामिनी पथकाची नजर

महिला व मुलींची छेडखानी रोखण्यासाठी दामिनी पथक कार्यरत आहे. हे पथक विशेष वाहनाने उद्याने आणि तलावावर गस्त घालते. सार्वजनिक ठिकाणी गैरप्रकार होत असल्यास कारवाई केली जाते.

उज्ज्वला मडावी, सहायक पोलीस निरीक्षक, भरोसा सेल.

सध्या पालक आणि मुलांमधील संवाद हरवला आहे. पालकांचे मुलांकडे होणारे दुर्लक्ष मुलांच्या भवितव्यासाठी घातक ठरत आहे. वयात येत असलेली मुले भविष्याचा विचार न करता प्रेमात पडतात. एकांत मिळावा म्हणून उद्याने किंवा तलावावर फिरतात.  या समस्येवर समाधान शोधणे गरजेचे आहे.

प्रा. राजा आकाश, मानसोपचारतज्ज्ञ.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Crowds of young boys and girls are growing in the lake and park zws

ताज्या बातम्या