|| अनिल कांबळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्षभरात पुण्यात सर्वाधिक पोलीस आणि अधिकाऱ्यांवर कारवाई ; प्रकरणे मिटविण्यासाठी नागरिकांचाही आडमार्गाकडे कल

नागपूर : सांस्कृतिक नगरी… साहित्यिक- कलाकारांचे शहर…  दर्दी-रसिकांचे गाव… मार्मिक टीका-टिप्पण्यांच्या मर्मज्ञांची वस्ती… पुस्तकप्रेमींची पंढरी आणि कशाच्याही बाबत ‘पाटी’ठोकपणे उणे नसल्याचा दावा करणाऱ्या पुणे शहराचा समाज निर्देशांक गेल्या वर्षभरात लाचखोरीत अव्वल ठरला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) ही माहिती समोर आली आहे.

विविध प्रकरणांत लाच घेताना गेल्या वर्षभरात सर्वाधिक अधिकारी आणि पोलीस पुण्यात सापडले आहेत. याचा अर्थ लाच घेण्याची प्रकरणे जितकी घडली, त्याच पटीत ती देणाऱ्यांचीही संख्या अधिक असल्याचे स्पष्ट झाले. म्हणजेच पुणे शहर लाच देणाऱ्यांतही पहिल्या क्रमांकाचे ठरले आहे.

गेल्यावर्षी पोलीस विभागातील सर्वाधिक अधिकारी आणि कर्मचारी लाच घेताना सापडले. पोलीस विभागात १७३ कारवाया करण्यात आल्या. यामध्ये एसीबीने राज्यभरातून २५५ जणांना लाच घेताना अटक केली. आरोपींमध्ये वर्ग एक दर्जाचे तब्बल ८ तर वर्ग दोनच्या १९ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात लाचखोरीत द्वितीय स्थानावर महसूल, भूमी अभिलेख आणि नोंदणी विभाग असून या विभागांमध्ये १७८ कारवाया करण्यात आल्या. यात २५२ जणांना लाच घेताना अटक करण्यात आली. या विभागात सर्वाधिक १६ वर्ग एकचे अधिकारी आणि ६ वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पंचायत समितीमध्ये ५७ सापळे रचण्यात आले. यात ७८ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली. तसेच राज्य विद्युत वितरक कंपनी आणि महानगर पालिका विभागावर ५१ कारवाया करीत अनुक्रमे ६८ आणि ७७ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली.

राज्यातील तब्बल ६९ वर्ग एक दर्जाचे अधिकारी लाचखोरीत अडकले असून २ कोटी ६४ लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे

पुणे आणि लाचदुणे…

पुणे शहरात गेल्या वर्षभरामध्ये लाचखोरीची एकूण १६८ प्रकरणे उघडकीस आली. त्यांत २४२ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. वाहतूक नियमभंग करण्यापासून छोट्या-छोट्या गुन्ह्यांमध्ये लाच मागितली जाते आणि मनस्ताप टाळण्यासाठीही नागरिकांकडून स्व:प्रेरणेने ती दिली जाते, हे समोर आले आहे.

तक्रारी सर्वाधिक…

पुणे विभाग या यादीमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर असण्याचे एक कारण लाचखोरीविरोधात तक्रार करण्याचे प्रमाण इतर विभागांच्या तुलनेत अधिक असल्याचे आहे. तक्रार करून लाचखोरांना धडा शिकविणारे सजग नागरिक इतर विभागांत कमी असल्याचे सामाजिक अभ्यासकांचे म्हणणे आहे.

मुंबई यात कुठे?

लाचखोरीत पुणे शहर अव्वल क्रमांकावर असून द्वितीय स्थानावर औरंगाबाद आहे. तर नागपूर तिसऱ्या स्थानी आहे. आश्चर्यकारकरीत्या गुन्हेगारीसाठी बदनाम असलेल्या मुंबईचा क्रमांक या यादीत आठव्या स्थानी आहे.

कारवाईरहित विभाग…

कारागृह विभाग, क्रीडा विभाग, प्रदूषण नियंत्रक मंडळ, नगरपालिका आणि अन्न व औषधी द्रव्य विभागात यावर्षी एकही कारवाई झाली नाही.

शासकीय कामासाठी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना कुणीही लाच देऊ नका. लाच घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. कुणीही लाच मागितल्यास त्यांची एसीबीकडे लेखी तक्रार करा.

  – राकेश ओला (पोलीस अधीक्षक,   लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर)

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cultural capital action against most police officers pune bribery prevention department in front of the information akp
First published on: 22-01-2022 at 01:25 IST