scorecardresearch

लोकजागर : द्वेषाची ‘प्रयोगशाळा’!

विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असे बिरुद मिरवणारी अमरावती ही सध्या राजकीय प्रयोगशाळा झालीय.

देवेंद्र गावंडे
विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असे बिरुद मिरवणारी अमरावती ही सध्या राजकीय प्रयोगशाळा झालीय. गेल्या तीन वर्षांत इथे वरचेवर जे प्रयोग होत आहेत ते बघून कुणीही थक्क होईल. राजकारणात असे प्रयोग सुरूच असतात. त्यात वावगे काहीच नाही. मात्र त्यातून निघणारे निष्कर्ष जीवघेणे नको. याचाच आणखी स्पष्ट अर्थ म्हणजे असल्या प्रयोगातून सामाजिक तेढ, धार्मिक द्वेषाचे पीक यायला नको. या शहरात व जिल्ह्यात नेमके तेच उगवताना दिसतेय. सध्याच्या स्थितीवर बोलण्याआधी जरा मागे वळून बघू.
अमरावती लोकसभेची जागा राखीव झाल्यापासून त्यावर कुणाचा हक्क यावरून काँग्रेस व राष्ट्रवादीत कायम कुरघोडीचे राजकारण होत राहिले. सर्वाना मान्य असलेले दादासाहेब गवई असेपर्यंत ही कुरघोडी बंद दाराआड चालायची. नंतर ती चव्हाटय़ावर आली इतकेच! गेल्यावेळी सुद्धा याचाच प्रत्यय अखेरच्या क्षणापर्यंत येत गेला. काँग्रेसचे नाक कापण्याच्या नादात स्वत:जवळ उमेदवार नसताना राष्ट्रवादीने राणा दाम्पत्याला आयात केले. या ‘पुण्यकर्माचे’ धनी प्रफुल्ल पटेल व अनिल देशमुख. सत्ता कुणाचीही असो, त्याच्या वळचणीला राहण्याची सवय लावून घेतलेल्या राणांना पाठबळ देणे किती धोक्याचे ठरू शकते याची जाणीव असून सुद्धा राष्ट्रवादीने ही कृती केली ती केवळ काँग्रेसला डिवचता यावे म्हणून! या पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार तसे मुरब्बी. पण विदर्भात ऐकायचे तर फक्त पटेल व देशमुखांचे या त्यांच्या सवयीने घात केला. आता आजची स्थिती काय तर हे राणा केवळ राष्ट्रवादीच नाही तर महाविकास आघाडीसाठी अवघड जागचे दुखणे होऊन बसलेत.
विजय मिळवताच भाजपला जवळ करणाऱ्या या दोघांनी सरकारला व त्यातल्या त्यात शिवसेनेला अगदी सळो की पळो करून सोडलेय. यामुळे खरी पंचाईत झाली ती पवारांची. कारण त्यांच्याच पुढाकाराने हे सरकार स्थापन झालेले. त्यामुळेच ते वेळ काढून अमरावतीत आले. शिवपरिवाराच्या गोतावळय़ात रमले. मात्र या त्यांच्या साऱ्या दौऱ्यावर पश्चात्तापाचे सावट दिसत राहिले. यातली गंमत म्हणजे, जो प्रयोग राष्ट्रवादीने निवडणुकीच्या वेळी राबवला त्याची सारी सूत्रे आता भाजपने हाती घेतली असून सरकारला जेरीस आणण्यासाठी जाणीवपूर्वक राणांना समोर केले. गेल्या काही महिन्यांपासून या शहरात व जिल्ह्यात जे सुरू आहे ते याच प्रयोगाचे वेगवेगळे कप्पे! कधी पुतळा, कधी झेंडा तर कधी शाईफेक तर कधी हनुमान चालिसा. राणांना समोर करून ही सारी राजकीय कथानके कोण रचतेय याची कल्पना साऱ्यांना आहेच. त्याला प्रत्युत्तर देण्याच्या नादात आघाडीतील नेत्यांची अक्षरश: दमछाक होताना दिसते. हे तेच अमरावती आहे जिथे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. अजूनही आत्महत्या थांबायला तयार नाहीत. रोखीचे पीक अशी ओळख असलेल्या संत्री उत्पादकांची परवड कायम आहे. गेल्या अनेक दशकापासून आ वासून उभा असलेला अनुशेषाचा प्रश्न सुटलेला नाही. अर्धवट सिंचन प्रकल्प पूर्ण होण्याची वाट बघत आहेत. बेरोजगारीच्या सर्वाधिक झळा सहन करणारा हा भाग आहे. मेळघाटमधील कुपोषण व बालमृत्यू थांबण्याचे नाव घेत नाहीत. हे सारे प्रश्न जणू सुटलेत. आता केवळ धर्माचेच प्रश्न तेवढे शिल्लक राहिलेत अशा थाटात हे नवे विदूषकी प्रयोग सुरू आहेत.
सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या या शहराला व एकूणच वऱ्हाडाला लाज वाटायला लावणाऱ्या या घटना आहेत. त्याचे कुणालाही सोयरसुतक नाही. कारण प्रत्येकजण या कुरघोडीच्या प्रयोगात दंग आहे. मराठीएवढीच लाघवी अशी ओळख असलेल्या या वऱ्हाडी बोलीच्या प्रदेशात ‘हनुमान चालिसा’ हा हिंदी शब्द आहे याचेही भान अनेकांना राहिलेले नाही. कायम प्रसिद्धीच्या झगमगाटात राहण्याची सवय असलेल्या राणांसाठी तर ही सुवर्णसंधीच चालून आलेली. सध्या देशभरात सत्तासुख अनुभवणाऱ्या भाजपमध्ये या माध्यमातून जितके वर जाता येईल तेवढे जायचेच व पुढील निवडणुकीची बेगमी करून ठेवायची या एकाच ध्येयाने पछाडलेले राणा अगदी न थकता या प्रयोगात सामील झालेत. त्यांना तेवढय़ाच उत्कटतेने साथ मिळाली आहे ती डॉ. अनिल बोंडेंची. ते मूळचे शिवसेनेचे. नंतर स्वत:च पक्ष स्थापन केला. त्यात कंटाळल्यावर ते भाजपमध्ये दाखल झाले. काय बोलू व किती बोलू या घाईत सदैव असलेल्या बोंडेंना पक्षातल्या पायऱ्या फटाफट चढायच्या आहेत. या नादात आपण किती वादग्रस्त बोलतो याचेही भान त्यांना नसते. बाहेरची माणसे पक्षात आली की मीच किती निष्ठावान हे दाखवण्याच्या नादात अनावश्यक सक्रियता दाखवतात. बोंडे व राणा याचे उत्तम उदाहरण. अशा नव्यांकडून वेगवेगळी भूमिका वठवून घेण्यात भाजप माहीर. त्याचाच प्रत्यय या शहरात वारंवार येतोय.
अमरावती हे तसे मिश्रवस्तीचे शहर. येथून निवडून यायचे असेल तर साऱ्यांचीच मदत लागते. चाणाक्ष राणा म्हणूनच भोंग्याच्या विषयाला अजिबात स्पर्श करीत नाहीत. हनुमान चालिसा त्यांनी छातीशी घट्ट धरून ठेवलीय. तरीही दगाफटका झालाच व कुणा एका विशिष्ट धर्माची मते कमी झालीच तर या द्वेषाच्या घुसळणीतून होणारा फायदा आहेच की नफ्याच्या खात्यात, असा हा सरळ सरळ हिशेब. येत्या निवडणुकीपर्यंत हे प्रयोग सुरू राहतील, तेही वेगवेगळय़ा स्वरूपात. मात्र त्यातील पात्रे बदलणार नाहीत. एकाचवेळी सरकारला जेरीस आणणे व मतपेढी वाढवणे असा त्यामागचा दुहेरी उद्देश. गेल्या सात वर्षांपासून अख्ख्या देशाचाच राजकारणाचा पोत बदलला. सत्तेसाठी आक्रमक राजकारण हेच यामागचे सूत्र. आधीही राजकारणात, त्यातून होणाऱ्या प्रयोगात आक्रमकता असायची पण त्यातले मुद्दे जनतेच्या प्रश्नाशी निगडित असायचे. आताच्या आक्रमकतेचे स्वरूप वेगळे. यातून निर्माण होणारा विखार जनतेची मते दुभंगणारा, द्वेषाचे विष कालवणारा. याची जाणीव साऱ्यांना आहे. तरीही सलोख्यासाठी कुणी एकत्र येत नाही. विरोधकांनी कथानक रचायचे व ते कसे खोटे व द्वेषमूलक हे सांगण्यात सत्ताधाऱ्यांनी सारी ताकद खर्ची घालायची असाच हा प्रकार. अमरावती सुद्धा त्याला अपवाद नाही. उलट या नव्या राजकीय प्रयोगाचे विदर्भातले एक केंद्र अशी नवी ओळख या शहराने, परिसराने मिळवलेली. एकेकाळी हाच जिल्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण यासाठी देशभर चर्चेत राहायचा. तेव्हा साऱ्यांचे दौरे याच कारणासाठी असायचे. शेतकऱ्यांचे प्रबोधन, बालकांना पोषण आहार यावर चर्चासत्रे झडायची. सारे एकत्र येत सामूहिक विवाह सोहळे साजरे करायचे. उद्देश एकच, दु:खींना दिलासा मिळावा. आता हे प्रश्न कायम असून सुद्धा अमरावतीची ही ओळखच पुसून गेलेली. नवी ओळख अधिक भयकारी. दंगल उद्भवत नाही, ती घडवली जाते हे सूत्र आधीपासून प्रस्थापित असलेले. आजच्या सत्ताधाऱ्यांनी विरोधात असताना सुद्धा हे केले. तेच सूत्र नव्या स्वरूपात अतिशय आक्रस्ताळेपणाने वापरले जात आहे. यातून आकार घेणाऱ्या प्रयोगांची संख्या व त्यातले सातत्य चिंतेत भर घालणारे. हे उरात धडकी भरवणारे प्रयोग कधी थांबतील?
devendra.gawande@expressindia.com

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cultural capital political religious hatred city district loksabha amy

ताज्या बातम्या