लोकसत्ता टीम
बुलढाणा : बुलढाणा मतदार संघाचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात धारधार तलवारीने केक कापून तलवारीनेच इतरांना भरविल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांनी आमदार संजय गायकवाड यांच्यासह आयोजकावर गुन्हे दाखल केले आहे.
बुलढाणा शहर पोलिसानी स्वतःहून ही कारवाई केली आहे. मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ नुसार सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याच्या आरोपावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यासह कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध ही कारवाई केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी याला दुजोरा दिला आहे. यापूर्वी मागील १५ ऑगस्ट रोजी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे चिरंजीव मृत्युंजय गायकवाड यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. बुलढाणा शहर परिसरात जागोजागी शुभेच्छा पर फलक लावण्यात आले होते. सध्याकाळी संपर्क कार्यालयासमोर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित कारण्यात आला.
आणखी वाचा-बुलढाणा: मलकापुरात मुसळधारेसह वज्राघात; महिलेचा मृत्यू, एक गंभीर
यावेळी चाहते, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. दरम्यान आपल्या मुलाच्या वाढदिवसाला धारदार तलवारीने केक कापला आणि पत्नी तथा बुलढाणा नगर परिषदच्या माजी अध्यक्ष पूजा गायकवाड आणि इतर सोयऱ्यांना तलवारीनेच भरविल्याचा ‘व्हिडीओ’ समाज माध्यमावर ‘व्हायरल’ झाला. यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली.त्या अगोदर मृत्युंजय गायकवाड यांचे जाहीर औक्षवण करण्यात आले. या ‘बर्थडे सेलिब्रेशन’ची चित्रफीत (व्हिडिओ) सोशल मीडियावर चांगलीच सार्वत्रिक झाली आणि गाजली.
दरम्यान तलवारीने केक कापल्याने जिल्ह्यात अनेक व्यक्तींवर आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे. अलीकडच्या काळात मोताळा, देऊळगाव राजा, मेहकर तालुक्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारावर बुलढाणा पोलीस विभाग काय कारवाई करतात काय याकडे राजकीय वर्तुळ आणि नागरिकांचे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहर पोलिसांनी वरील कारवाई केली आहे.
आणखी वाचा-ठाकरे गटाचा आणखी एक आमदार ‘एसीबी’च्या रडारवर! पाल्यांच्या शैक्षणिक खर्चाची…
आमदाराचा अजब दावा
दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सार्वत्रिक झाल्यावर बुलढाण्यासह राज्यात खळबळ उडाली होती. विरोधी पक्षांनी टीका केली होती. या प्रकरणी शनिवारी, १७ऑगस्ट रोजी माध्यमांसोबत बोलताना आमदार गायकवाड यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले होतेतलवारीने केक कापणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही असा दावा त्यांनी केला होता. मागील काळात पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात असे गुन्हे काही लोकांवर दाखल केले ते चुकीचे असल्याचे ते म्हणाले होते. कारण तलवारीचा वापर कोणाला मारण्यासाठी केला धमकावण्यासाठी केला किंवा दंगलीमध्ये केला असेल तर शंभर टक्के गुन्हा दाखल होऊ शकतो.
काही व्यासपीठांवर राजकीय पुढार्यांना तलवारी गिफ्ट दिल्या जाते. त्या आपण पब्लिकला दाखवतो. किंवा मुख्यमंत्री तलवार जनतेला दाखवतात. तलवार बहादुरीचे प्रतीक आहे म्हणून ते दाखवले जाते.तलवार दाखवण्याने जर गुन्हा होतो तर पोलीस परेडमध्ये एखादा डीवायएसपी हजारोच्या गर्दीला ती तलवार दाखवतो तो त्याचा सॅल्यूट करतो तो का मारायला दाखवतो का? असा अजब तर्क त्यांनी उपस्थित केला.
यावरच न थांबता ऑलम्पिक मधील पिस्तूल, रायफल . ऑर्चरीचे खेळ बंद करावे लागेल तलवारबाजी बंद करावी लागेल असा अजब युक्तिवाद त्यांनी केला. समोरच्या व्यक्तीचा उद्देश काय हे महत्त्वाचे. मारण्याचा असेल तर शंभर टक्के गुन्हा दाखल झाला पाहिजे.. अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला तर हायकोर्टात गुन्हा ‘क्रॅश’ करू शकतो, अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली होती. त्यांनी केलेल्या या युक्तिवाद, तर्क, दाव्यावर काँग्रेस नेत्या तथा प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी टीका केली आहे.