भंडारा : आपल्या वाहनावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ई-चलान जारी करण्यात आले आहे. कृपया खालील लिंकवर क्लिक करून दंड भरा,’ असा मोबाईलवर संदेश वाहनधारकांना पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचा नवा सायबर फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या बनावट संदेशांमधील लिंकवर क्लिक करताच नागरिकांची बँकिंग माहिती चोरून काही क्षणांतच खात्यातील रक्कम लंपास करण्याचे प्रकार वाढत असल्याने वाहनधारकांनी अत्यंत सावध राहण्याची गरज आहे.
सायबर गुन्हेगारांकडून वाहनधारकांना अधिकृत संदेशासारखे दिसणारे एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप संदेश पाठविले जात आहेत. या संदेशात वाहन क्रमांकासह दंड भरावा, अन्यथा वाहन जप्त केले जाईल किंवा परवाना निलंबित होईल, अशा प्रकारची भीती निर्माण करणारी भाषा वापरली जाते. घाईगडबडीत अनेक नागरिक संबंधित लिंकवर क्लिक करून ऑनलाइन पेमेंट करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ही लिंक अधिकृत संकेतस्थळाऐवजी बनावट वेबसाइटवर घेऊन जाते.
यानंतर मोबाईलवर विविध परवानग्या मागितल्या जातात किंवा बँक खात्याशी संबंधित माहिती, एटीएम कार्ड तपशील, ओटीपी, यूपीआय पिन किंवा नेट बँकिंगची माहिती मागितली जाते. ही माहिती मिळताच सायबर गुन्हेगार काही मिनिटांतच खात्यातील संपूर्ण रक्कम परस्परांच्या खात्यात वळवतात. अनेक प्रकरणांमध्ये मोबाईलवर रिमोट ॲक्सेस अॅप डाउनलोड करून घेत नागरिकांच्या मोबाईलवरील नियंत्रणही मिळवले जात असल्याचे समोर आले आहे.
याबाबत वाहतूक नियंत्रण शाखेकडून माहिती घेतली असता, ई-चलानच्या नावाने बनावट लिंक पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याची माहिती देण्यात आली. नागरिकांनी अशा कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, तसेच अनोळखी व्यक्तीला बँकेची गोपनीय माहिती किंवा ओटीपी देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहनाचे ई-चलान तपासायचे असल्यास केवळ शासनाच्या अधिकृत पोर्टलवर किंवा अधिकृत मोबाईल ॲपवरच तपासणी करावी. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या संदेशांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ बँकेशी संपर्क साधून खाते सुरक्षित करावे आणि राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन 1930 वर तक्रार नोंदवावी किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेकडून करण्यात आले आहे.
सायबर गुन्हेगार सतत नवनवीन युक्त्या वापरून नागरिकांना जाळ्यात ओढत आहेत. त्यामुळे लिंकवर क्लिक करण्यापूर्वी खात्री करा; अन्यथा एका क्लिकची चूक आयुष्यभराची आर्थिक फसवणूक ठरू शकते, असा इशारा वाहतूक नियंत्रण शाखेकडून देण्यात आला आहे.
अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीच्या घटना अलीकडच्या काळात वारंवार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. आपल्या वाहनावरील ई-चलन (ई-चालान), दंड अथवा प्रलंबित प्रकरणांची अधिकृत माहिती मिळविण्यासाठी नागरिकांनी ‘महापोलिस’ हे ॲप डाउनलोड करून त्यामध्ये नोंदणी करावी. त्यानंतर संबंधित वाहन क्रमांक नोंदविल्यास वाहनावरील सर्व दंड, प्रकरणे व इतर माहिती अधिकृतरीत्या पाहता येते. याशिवाय, कोणत्याही वाहतूक शाखेच्या कार्यालयात अथवा वाहतूक अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या यंत्राद्वारे (हँडहेल्ड डिव्हाइस) देखील वाहनाची माहिती तपासून घेता येते. कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून किंवा संशयास्पद लिंकद्वारे आलेल्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, तसेच अशा लिंकवर क्लिक करून ऑनलाइन व्यवहार करू नयेत. नागरिकांनी सतर्क राहून अशा सायबर फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक तिवारी यांनी केले.
