सकाळी घरात येणारे वर्तमानपत्र असो वा भ्रमणध्वनीवरील समाजमाध्यमे. सायबर फसवणूकीशी निगडीत एखादे वृत्त तरी हमखास दिसतेच. यात कधी डिजिटल अरेस्ट, कधी फेडेक्स पार्सल, कधी कर अधिकारी, कधी पार्ट टाईम जॉब तर कधी सीबीआय, कस्टम्स अधिकारी, अथवा बँक किंवा वीज वितरण कंपनी अशी २० हून अधिक युक्ती वापरत सायबर भामटे निरपराध लोकांची फसवणूक करतात. त्याला बळी पडून अनेकजण आयुष्यभराची पुंजी गमावतात. अशा २० सायबर गुन्ह्यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी नवा सायबर अलर्ट तज्ज्ञांनी जारी केला आहे. हा नियम काटेकोरपणे पाळला तर सायबर भामट्यांचा कोणताही डाव तुमच्यावर उलटणार नाही, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
नक्की काय लक्षात ठेवायचे?
कोणताही सरकारी विभाग, बँका किंवा मोठ्या कंपन्या केवळ त्यांच्या अधिकृत खात्यातच व्यवहार करतात. त्यामुळे कधीही घाई करू नका. भीती दाखवून किंवा पैशांचे आमिष दाखवून सायबर भामटे घाईगडबड करतात. ‘आत्ताच्या आत्ता पैसे भरा, नाहीतर अटक होईल किंवा वीज कापली जाईल’, तुमचे बँक खाते बंद होईल, अशी भीती दाखवतात. अशा वेळी शांत राहा आणि स्थानिक पोलिसांशी किंवा संबंधित कंपनीच्या अधिकृत केंद्रात जाऊन खात्री करा. एक मिनिटाचा विचार आणि ‘ही साधा कृती आयुष्यभराची कमाई वाचवू शकते.
काय आहे ‘हा’ एक सुवर्णनियम….
कोणतीही अधिकृत संस्था, बँक किंवा सरकारी विभाग कधीही ग्राहकाकडून वैयक्तिक बँक खात्यात पैसे मागत नाही. जर असा कॉल करणारी, संदेश पाठवणारी, अथवा समाजमाध्यमांवरील व्हॉट्सॲपवरून बोलणारी व्यक्ती: स्वतःला पोलीस, सीबीआय, कस्टम्स किंवा कोर्टाचा अधिकारी सांगत असेल आणि तो बँकेचा, नामांकित कंपनीचा, वीज मंडळाचा किंवा कूरियर एजन्सीचा प्रतिनिधी असल्याचा दावा करत असेल, तर सावध व्हा. तुम्हाला कोणत्याही कारणासाठी दंड, प्रक्रिया शुल्क, अथवा व्हेरिफिकेशन क्रमांक, अथवा कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी ‘वैयक्तिक बँक खात्यात’ रक्कम वळती करायला सांगत असेल……तर !. हे सांगणारा व्यक्ती सायबर ठगबाज आहे, हे लक्षात ठेवा.
युपीआय ’ ची देखील सुरक्षा बाळगा….
गेल्या काही वर्षांत सगळ्यांच्याच खिशातील पैशांचे पाकीट हलके झाले आहे. अनावश्यक रोख रकमेचे ओझे कमी झाले आहे. खिशातला भ्रमणध्वनी स्मार्ट झाल्याने साहजिकच आर्थिक व्यवहारही हलके झाले आहेत. भाजीपाल्यापासून ते सोने खरेदींपर्यंत आपण अगदी सहज पेटीएम, फोन पे, जी. पे., आरटीजीएस, किंवा भीम सारखे भ्रमणध्वनी अॅप्लिकेशन वापरतो. एक क्लिकवर व्यवहार करतो. ही सवय आता प्रत्येकाच्या अंगवळणी पडली आहे. पण जेव्हा जेव्हा सायबर फसवणुकीच्या बातम्या समोर येतात, तेव्हा प्रत्येकाच्या मनात युपीआय ॲप्स सुरक्षित आहेत का? हा एकच प्रश्न येतो.
फोनची सुरक्षा तपासा….
सायबर तज्ज्ञांच्या मते खरी समस्या ॲप्समध्ये नाही, तर हातातल्या ‘मोबाईल’मध्ये आहे. घराचा मुख्य दरवाजा अत्यंत मजबूत, डिजिटल लॉक असलेला आहे. पण जर इतर खिडक्या उघड्या असतील, तर घर सुरक्षित राहील का? … हे आधी लक्षात घ्या.
मोबाईलमध्ये ‘अनोळखी पाहुणा’ तर नाही ना….?
आजकाल सामान्य स्मार्टफोनमध्ये कमीत कमी ५० ते ६० मोबाईल ॲप्स असतात. त्यामुळे भ्रमणध्वनीवर एखाचे अॅप्लिकेशन अंधळेपणाने डाऊनलोड करत असताना स्वतःलाच एक प्रश्न विचारा. तो म्हणजे तुमच्या फोनमधील प्रत्येक ॲप तुम्हाला ओळखीतले आहे का… त्याचा तुम्ही नेहमी वापर करता का….हे तपासा. याचे उत्तर जर ‘नाही’ असेल, तर ही गंभीर धोक्याची घंटा असू शकते.
अनोळखी ॲप्स कसे येतात….?
एखाद्या संशयास्पद लिंकवर क्लिक केल्याने, मोफत वाय-फाय वापरल्याने किंवा समाजमाध्यमांवरील आकर्षक जाहिरातींना बळी पडल्याने आपल्या नकळत अनेक ‘गुप्त’ ॲप्स भ्रमणध्वनीत साठवले जातात.
आर्थिक व्यवहारांवर गुप्त देखरेख…
हे ॲप्स तुमच्या भ्रमणध्वनीत बसून तुमच्या स्क्रीनचा एक्सेस मिळवतात. त्यावरील प्रत्येक ओटीपी (एक वेळा वापरला जाणारा गुप्त क्रमांक) वाचतात आणि तुम्ही कधी काय टाईप करता यावर नजर ठेवतात. युपीआय ॲप्स कितीही सुरक्षित असले, तरी ज्या भ्रमणध्वनीवर ते चालतात तोच जर असुरक्षित असेल, तर भामटे सहज खात्यावर डल्ला मारू शकतात.
‘थर्ड पार्टी’ ॲप्स आणि बँकेची भूमिका….
बरेचदा सायबर फसवणूक झाल्यावर लोक बँकेत धाव घेतात. पण अनेक प्रकरणात बँका तक्रार नोंदवून घेण्यास असमर्थ असतात. कारण पेटीएम, फोन पे, जी पे ही ही ‘थर्ड पार्टी’ अर्थात खासगी ॲप्स आहेत. त्यावर बँकांची देखरेख नसते. तुम्ही बँकेच्या अधिकृत ॲपऐवजी दुसऱ्या कोणत्याही खासगी ॲपवरून व्यवहार होत असतील तर त्यातून उद्भवणाऱ्या तांत्रिक किंवा सायबर समस्येला बँक जबाबदार असत नाही.
काय म्हणतात तज्ज्ञ
भ्रमणध्वनीवर अॅप्लिकेशन डाऊनलोड करताना ते सुरक्षित आहे का याची खात्री केली पाहिजे. कोणतीही बँक तुम्हाला तुमचा गुप्त क्रमांक मागत नाही. त्यामुळे भिती बाळगून अनोळखी क्रमांकावरील एपीके फाईल डाऊनलोड करण्याची घाई करू नका. अनावधाने चूक झालीच तर एका तासाच्या आत सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार करा. यातून किमान गमावलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता वाढते. -दिपक अग्रवाल, पोलीस उपायुक्त,
सायबर शाखा भ्रमणध्वनीचे दर काही दिवसांनी ऑडिट करा. फोनच्या सेटिंगमधील अॅप्समधून तुम्हाला माहिती नसलेले किंवा न वापरलेले ॲप्स वगळून टाका. अनधिकृत लिंक्सवर क्लिक करू नका. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर परवानग्या देताना कॉल्स, मेसेज किंवा गॅलरीचा एक्सेस का हवाय? हे तपासून पहा. शक्यतो बँकेचे अधिकृत ॲप वापरा. –सुनिल सदासिवन, सायबर तज्ज्ञ
