अमरावती : परतवाडा येथील एका व्यावसायिकाची ३१ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी ग्रामीण सायबर पोलिसांनी छत्तीसगडमधून एका टोळीला अटक केली. ही टोळी ग्रामीण भागातील सर्वसामान्य व्यक्तींना गाठून त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाते उघडत होती. दरम्यान खाते उघडण्यासाठी बँकेचे स्टॅम्प तसेच एका सरपंचाचा शिक्कासुध्दा या टोळीकडून जप्त करण्यात आला आहे. या टोळीतील प्रत्येकाला खाते उघडल्यानंतर प्रत्येक खात्यासाठी १५ ते ५० हजार रुपयांपर्यंत कमिशन मिळत असल्याचे धक्‍कादायक वास्तव पोलीस तपासात समोर आले आहे.

सायबर गुन्‍हेगारांच्‍या या टोळीची साखळी शोधण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हे आरोपी सर्वसामान्य नागरिकांना गाठून त्यांचे आधार कार्ड व अन्य आवश्यक कागदपत्र घेत होते. त्यानंतर अन्य काही कागदपत्रे तयार करण्यासाठी स्वत:कडील शिक्के वापरत होते. त्यानंतर बँकेत कार्पोरेट खाते उघडल्यास ५० हजार रुपये, करंट खात्यासाठी ३० हजार तर बचत खात्यासाठी २० हजार रुपयांचे कमिशन आरोपींना एका खात्यासाठी मिळायचे. याच कमिशनपैकी पाच ते दहा हजार रुपये ज्याच्या नावे खाते उघडले जात होते, त्याला आरोपीकडून दिले जायचे. याच खात्यावर ऑनलाईन फसवणुकीची रक्कम मुख्य आरोपींकडून सातत्याने फिरवून पोलिसांची दिशाभूल केली जात होती. या टोळीने आजवर सुमारे दीडशे खाते काढल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

हेही वाचा…पुन्हा एक वाघ कायमचा पिंजऱ्याआड….

रितेश अरुणकुमार अजंगले (२४) रा. ठठारी, मायकल खेमलाल साहू (२४) रा. जैजैपूर, रवींद्र राजेंद्र यादव (२९) रा. बसंतपूर, अमन महादेव हरपाल (३८) रा. कातुल बोर्ड, शैलेंद्रसिंग नारायणसिंग चव्हाण (३५) रा. भरकापारा व दिगंत शशिकांत अवस्थी (३८) रा. बनभेडी, छत्तीसगड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. परतवाड्यातील घामोडिया प्लॉट येथील रहिवासी आशीष महादेवराव बोबडे (४४) हे समाज माध्‍यमावरील ‘फोर्थ इंडियन स्टॉक मार्केट ॲनालिसीस ॲण्ड लर्निंग’ या शेअर बाजाराशी संबंधित समूहाचे सदस्‍य बनले. त्यावर आलेल्या लिंकवर क्लिक केल्‍यानंतर त्यांनी त्यावर युझर आयडी व पासवर्ड बनविला. त्यानंतर संकेतस्‍थळावरील लिंकद्वारे त्यांनी ३१ लाख ३५ हजार रुपयांचे शेअर खरेदी केले. दरम्यान, पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी ते काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ते संकेतस्‍थळ बंद दिसून आले. त्यामुळे त्यांनी समूहामधील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, मोबाइलही बंद होता. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी परतवाडा ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.