वर्धा : विविध प्रलोभने देत ग्राहकांना मोबाईलच्या माध्यमातून लुटण्याच्या घटना नित्य घडत आहे. सायबर गुन्हे शाखा अश्या बनवाबनवीच्या घटनांचा यशस्वी छडा लावत असतानाच येथील एका घटनेने नवेच आव्हान पोलिसांकडे उभे केले आहे. हजारो कोटींची उलाढाल असणाऱ्या वर्धा नागरी बँकेवर घातलेल्या सायबर दरोड्यात एक कोटी एकवीस लाख सोळा हजार रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली आहे. बुधवारी पहाटे बँक बंद असताना सकाळी सहा ते साडेआठ या वेळेत गंडा घातला. सकाळी बँक उघडल्यावर संगणकाची तपासणी सुरू केली असताना हा प्रकार हळूहळू उजेडात आला. विविध चोवीस खात्यांत ही रक्कम वळती केली गेली आहे. या बँकेकडे निफ्टी व आरटीजीएस सुविधा नाही. म्हणून बँकेने येस बँकेशी संलग्नता घेत त्या माध्यमातून या सुविधेचा उपयोग घेत व्यवहार केले. ही सुविधा हॅक करीत चोरट्यांनी नागरी बँकेच्या खात्यातील रक्कम वळती केल्याचे दिसून आले आहे. हेही वाचा - वाघांच्या संवर्धनामुळे कार्बन उत्सर्जनात घट, ‘नेचर इकॉलॉजी अँड इव्होल्युशन’चा अभ्यास या घटनेने बँक प्रशासन हादरून गेले आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांचन केळकर यांनी सर्व माहितीअंती शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सायबर गुन्हे शाखा पुढील तपासात लागली आहे. नागरी बँकेच्या ज्या ज्या खात्यांतील रक्कम वळती करण्यात आली आहे, ती सर्व खाती ब्लॉक करण्याच्या सूचना येस बँकेने दिल्या आहेत.