वर्धा : ऑनलाईन व्यवहारातून आर्थिक फसवणुकीचे प्रकार सतत वाढत आहेत. तरीही ठकसेन नाना शक्कल लढवून फसवणूक करीतच आहेत. साकुर्ली धानोली येथील शेतकरी हर्षल शरदराव महाबुधे यांचे पंजाब नॅशनल बँकेत खाते आहे. रात्री कोणताच व्यवहार न करता सकाळी उठून मोबाईल तपासला तेव्हा एकदा ३० हजार, परत तीन वेळा प्रत्येकी दहा हजार रुपये व काही काळाने १५ हजार असे एकूण ८५ हजार रुपये अन्य खात्यात वळते झाल्याचे दिसून आले. ही फसवणूक असल्याचे लक्षात आल्यावर महाबुधे यांनी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार केली. दैनंदिन वापरासाठी ते फोन पे व गुगल पेचा मोबाईलद्वारे उपयोग करतात. मात्र घटनेच्या दिवशी कोणतेही ॲप डाऊनलोड केले नव्हते. कोणतीही लिंक उघडली नव्हती. तसेच कुणाचे फोनही आले नाही. हेही वाचा >>> अमरावती : परकीय चलनाचे आमिष देत हाती दिले रद्दी कागद… अज्ञात व्यक्तीने युपीआय माध्यमातून पैसे वळते करीत फसवणूक केल्याचे कळते. तांत्रिक तपासात फसवणूक झालेली रक्कम भिलाई येथील आकाश लालबाबू चौधरी याच्या कॅनेरा बँकेच्या खात्यात वळती झाल्याचे दिसून आले. यात तोमेष लक्ष्मीनारायण निसाद हा भिलाईचाच सहआरोपी असल्याचे स्पष्ट झाले. दोघांनाही भिलाई येथून अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून तीन मोबाईल, अकरा सीमकार्ड, दहा एटीएम, तेरा चेकबूक व बँकेचे चार पासबुक जप्त करण्यात आले. दुसऱ्या एका घटनेत ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या सचिन विजय सिंह व गुरूदत्त निरज श्रीवास्तव या भामट्यांना अटक करण्यात आली आहे. श्रुती कुमारी नामक महिलेने तक्रार करणाऱ्या व्यक्तींना तिच्या ब्रोकर ऑफिसियल या समूहात सहभागी करून घेतले होते. त्यात तक्रारकर्त्यांचे मोबाईल क्रमांक होते. या समूहात ट्रेडिंगवर झालेल्या नफ्याबाबत संदेश यायचे. यापैकी काही संदेश व्यवहारासाठी योग्य वाटल्याने तक्रारकर्त्यांनी आयबी नावाचे ॲप डाऊनलोड केले. त्यामार्फत विविध कंपन्यांचे शेअर खरेदी करण्यास सुरुवात केली. ऑनलाईन व आरटीजीएसमार्फत ४० लाख १० हजार रुपये गुंतवले. हेही वाचा >>> अकोला : माथाडी कामगार आर्थिक अडचणीत, १६ वर्षांपासून… या गुंतवणुकीवर पुढे १ कोटी ८२ लाख ४७ हजारांचा नफा दिसून आला. नफा दिसत असल्याने शेअर विक्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेअर विकता आले नाही. अशी अडचण आली म्हणून तक्रारकर्त्यांनी ग्रुप ॲडमिन श्रुती कुमारी व याच ग्रुपमधील विल्यम अल्फ्रेड यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. तेव्हा शेअर विक्रीसाठी ५६ लाख ९५ हजार रूपये कर म्हणून भरावे लागतील, असे सांगण्यात आले. तेव्हा तक्रारकर्त्यांना आपली फसवणूक झाल्याचे निर्दशनास आले. तांत्रिक तपासात फसवणूक झालेल्या रकमेपैकी २० लाख रुपये अंबड (नाशिक) येथील सचिन विजय सिंह याच्या साई ट्रेडर्स नावे असलेल्या बँक खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले. त्याने गुरूदत्त श्रीवास्तव याच्या मदतीने हा गुन्हा केला. दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल, स्वाईप मशीन, विविध क्रेडिट कार्ड, चेकबूक, पासबूक, दुकानाचे लायसन्स व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. या दोन्ही सायबर गुन्ह्यात पोलीस अधीक्षक नुरूल हसन तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांचे मार्गदर्शन लाभले. सायबरचे पाेलीस निरीक्षक महेश चव्हाण व त्यांचे सहकारी गणेश बैरागी, विशाल मडावी, अनुप कावळे, नीलेश तेलरांधे, अनुप राऊत, अमित शुक्ला, रणजित जाधव, वैभव कटोजवार, अक्षय राऊत, दिनेश बोथकर, अंकित जिभे, पवन झाडे, लेखा राठोड व प्रतीक वांदिले यांनी कारवाई केली.