नागपूर : सायबर गुन्हेगारांनी फसवणूक करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरणे सुरु केले असून गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारांच्या रडावर सेवानिवृत्त शासकीय अधिकारी आणि कर्मचारी आहेत. वृद्धांना दूरध्वनी करून गंभीर गुन्ह्यात अडकल्याचे सांगून ‘डिजिटल अरेस्ट’ करण्याची भीती दाखवतात. त्यातून सुटका करण्यासाठी लाखो रुपये उकळतात. राज्यभरात ‘डिजिटल’ अटकेची भीती दाखवून लुबाडल्याचे सर्वाधिक गुन्हे मुंबई आणि पुण्यात दाखल आहेत. तर अशा फसवणुकीच्या गुन्ह्यात नागपूर शहराचा तिसरा क्रमांक लागतो. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. सायबर गुन्हेगारांनी आता लुबाडणूक करण्यासाठी ‘डिजिटल अटक’ ही नवीनच पद्धत म्हणजे सुरु केली आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीसाठी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आणि अधिकारी सायबर गुन्हेगारांच्या रडारवर आहेत. राज्यात ‘डिजिटल अटक’ची शेकडो गुन्हे दाखल असून आता अशा गुन्ह्यांचे लोन नागपुरातही पसरलले आहे. जेष्ठ नागरिकांना भ्रमणध्वनी आणि इंटरनेटचे तांत्रिक ज्ञान नसते. हीच बाब हेरून सायबर गुन्हेगार हे स्वतःला पोलीस, सीबीआय, आयटी, ईडीचे अधिकारी असल्याचे सांगून सेवानिवृत्त नागरिकांना फोन करतात. ‘ड्रग्स तस्करीत तुमचा मोबाईल क्रमांक सापडला आहे. तुमच्या क्रमांकावरून विदेशात फोन करण्यात आले आहेत. तुमच्या फोनवरून दहशतवाद्यांशी बोलणे झाले आहे, पैशाची देवाण-घेवाण झाली आहे. तसेच तुमच्यावर गंभीर गुन्हा दाखल होणार आहे.’ अशी बतावणी करतात. त्यामुळे वृद्ध घाबरतो आणि या अडचणीतून सुटका कशी करावी, याबाबत माहिती विचारतो. बनावट पोलीस अधिकारी ‘व्हिडिओ कॉल’ करून गुन्हा दाखल झाल्याचे सांगून डिजिटल अटक करण्याची धमकी देतात. त्यामुळे वृद्ध घाबरून जातात. त्यानंतर तपास आणि चौकशीच्या नावाखाली बनावट पोलीस अधिकारी वृद्धाची तासभर चौकशी करतात. गुन्ह्याबाबत अनेक प्रश्न विचारतात. परंतु, वृद्ध प्रश्नाचे उत्तरे देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे सांगण्यात येते. हेही वाचा.राज्यातील ५०० पोलीस उपनिरीक्षकांच्या खांद्यावर लागला ‘तिसरा स्टार’ सुटका करण्यासाठी लाखो रुपये जेष्ठ नागरिकांना सायबर गुन्हेगार डिजिटल अटक झाल्याचे सांगून पैशाची मागणी करतात. सुरुवातीला ३ ते ५ लाख रुपयांची मागणी करतात. अनेक वृद्ध अटकेला घाबरून पैसे अकाऊंटमध्ये टाकतात. पुन्हा मोठ्या अधिकाऱ्यांची चौकशी असल्याचे सांगून बँक खात्याची माहिती विचारतात. ती माहिती मिळताच वृद्धाच्या खात्यातील सर्व पैसे परस्पर दुसऱ्या खात्यात वळते करण्यात येतात. अशाप्रकारे वृद्धाची फसवणूक केली जाते. काय आहे डिजिटल अटक ? सायबर गुन्हेगार पोलीस असल्याचे सांगून व्हिडिओ कॉलवरूनच डिजिटल अटक केल्याचे सांगतात. म्हणजे तुमच्याच घरात पोलिसांच्या नजरकैदेत असल्याचे सांगून व्हिडिओसमोरच बसून राहण्यास सांगतात. कॅमेरा बंद करण्याची मनाई केली जाते किंवा व्हॉट्सअपवर ऑनलाईन हजेरी घेतली जाते. त्यात मॅसेज पाठविल्याबरोबर ‘हजर सर’ असे उत्तर द्यावे लागते. हेही वाचा.भंडाऱ्यात रक्तरंजित थरार… जन्मदात्या बापाकडून मुलाची निर्घृण हत्या तीन गुन्ह्यांत दोन कोटी लंपास नागपुरात कोराडी थर्मल पॉवर प्लांटमधून सेवानिवृत्त अधिकाऱ्याला डिजिटल अटक केल्याची बतावणी करून त्यांच्या बँक खात्यातून १ कोटी ३० लाख रुपये काढण्यात आले. तर एका सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेच्या खात्यातून २३ लाख २० हजार रुपये काढण्यात आले. तर एका अधिकाऱ्याच्या खात्यातूनही १८ लाख रुपये खात्यातून काढण्यात आले. हा सर्व प्रकार डिजिटल अटक केल्याची भीती दाखवून करण्यात आला. हेही वाचा.“गडचिरोलीतील खनिजांवर सरकारचा डोळा,” वांडोली चकमकीवरून नक्षलवाद्यांची आगपाखड जेष्ठ नागरिकांची फसवणूक करण्यासाठी डिजिटल अटक ही नवी शक्कल सायबर गुन्हेगारांनी काढली आहे. त्यापासून नागरिकांनी सतर्क राहावे. कुणाला जर ईडी, सीबीआय, इंकम टॅक्ट आणि पोलिसांच्या नावाने कुणी फोन करून डिजिटल अटकेबाबत सांगितल्यास दाद देऊ नका. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करा. - अमित डोळस, ठाणेदार, सायबर पोलीस स्टेशन, नागपूर