वर्धा : पक्षाचे चार आमदार व एक पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात भाजपला लागलेले ग्रहण आता सार्वजनिक चेष्टेचा विषय ठरत आहे. लोकं भरभरून मते देतात आणि भाजप नेते खेळ खेळतात, हे कुठवर चालणार, असा प्रश्न कार्यकर्ते विचारत आहेत. मुद्दा जुनाच. वर्षभरापूर्वी सूरू झालेला भाऊबंदकीचा. तत्कालीन आमदार दादाराव केचे यांची गादी बरखास्त करण्याचा निर्णय झाला. वरिष्ठ नेत्यांच्या भाषेत जुमेनासे झालेल्या केचे यांना घरी पाठविण्याची वेळ झाली म्हणून दरबारातील लाडक्यास उमेदवारी उमेदवारी देण्यात आली. त्यास अडचण म्हणून मग केचे यांना पक्षाचे वजीर म्हणून स्थान असणाऱ्याच्या दारी नेवून ठोस आश्वासन देण्यात आले. केचे विधान परिषदेवर गेले. पण शांत बसतील तर ते केचे कसले? सुमित वानखेडे यांच्या निवडणुकीत विरोधात काम केल्याचा ठपका बसला. तसा अहवाल मुंबईला गेला. कारवाई शून्य.

आता पालिका निवडणुकीत वरचष्मा नं मिळाल्याने केचे यांनी पक्षाचे उमेदवार पाडण्याचे प्रयत्न केले. त्यासाठी भाजप विरोधक काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे कारस्थानवजा आवाहन केले. भाजपचा आमदार विरोधकास मतदान करण्याचे करीत असलेले आवाहन त्यांना कधी काळी आमदार करण्यास मदत करणाऱ्या महिलांना खटकले. त्यांनी भर चौकात खरडपट्टी काढली. हा जाहीर तमाशा जगभर गेला. हे अनुचित म्हणून आमदार सुमित वानखेडे सोडून सर्व पक्षीय नेते दादाराव समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. तमाशा नाट्याचा हा दुसरा अंक. केचे सहानुभूती मिळवून गेले. पण त्यांना आमदार करण्यात वाटा असण्याचा दावा करणाऱ्या व केचे यांची नालस्ती करण्याची वेळ आलेल्या पराभूत महिला उमेदवार संकटात पडल्या. संसारी व वेळ मिळेल तेव्हा भाजपचे काम करणाऱ्या या महिलांवार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. या निष्पाप महिला आरोपी झाल्या. त्यांचे गुन्हेगार कोण ? सुमित वानखेडे की दादाराव केचे ? की आवर नं घालणारे प्रदेश वरिष्ठ? या प्रश्नाचे उत्तर नाहीच.

जिल्हाध्यक्ष संजय गाते म्हणतात मला कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. आर्वीत जे घडले ते दुर्दैवीच. या घडामोडीचा अहवाल तयार करून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पाठविला आहे. तेच निर्णय घेतील. मी काही करू शकत नाही. वरिष्ठ या दोन आमदारांच्या प्रकरणात केव्हा लक्ष घालतील, हे सांगता येत नाही. महापालिका निवडणुका असल्याने सर्व व्यस्त आहेत. पण पुढील आठवड्यात काही कारवाई अपेक्षित राहू शकते.