नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती द्वारे छापण्यात आलेल्या ‘जनता’ मराठी ३-६ खंडात अनेक चुका आहेत. ‘जनता’ च्या मूळ अंकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेे नाव व त्यांच्याकडील पदव्यांचा सुद्धा उल्लेख होता. परंतु या खंडात ते टाळण्यात आले असून संपादक, प्रकाशक व मुद्रक भास्कर रघुनाथ कद्रेकर यांचाही उल्लेख टाळण्यात आला. ही गंभीर चूक असून या प्रकरणी सदस्य सचिव प्रदीप आगलावे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भारतीय दलित पॅॅंथरचे अध्यक्ष पॅंथर प्रकाश बन्सोड यांनी केली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र ही दिले आहे.
सोअर्स मटेरियल, जनता, खंड ३-६, मराठी हा मूळ ‘जनता’ ची झेरॉक्स असून त्याचे संपादन डॉ. प्रदीप आगलावे यांनी केल्याचे नमूद आहे. मात्र, त्यांची नियुक्ती सदस्य सचिव म्हणून केलेली आहे. मूळ जनतामध्ये ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, एम.ए., पी.एच.डी., डी. एससी, बार-एट-लॉ यांनी प्रस्थापित केलेले जनहित प्रवर्तक साप्ताहिक पत्र जनता’ असा उल्लेख होता. परंतु खंडात त्याचा समावेश करण्यात आला नाही. मूळ जनताचे संपादक, प्रकाशक व मुद्रक श्री भास्कर रघुनाथ कद्रेकर यांचे नावाचा उल्लेख सोअर्स मटेरियल, जनता, खंड ३-६, मराठी मधील पान नं. एकवर छापण्याचे टाळून त्यांचे नाव नष्ट करण्याचे गुन्हेगारी कृत्य करण्यात आल्याचा आरोपही बन्सोड यांनी केला आहे.
सोअर्स मटेरियल, जनता, खंड ३-६, मराठी खंडात पान नं.९ वर मुंबई लेजिस्लेटीव्ह असेम्ब्लीसाठी स्वतंत्र मजूर पक्षाचे उभे असलेले उमेदवार म्हणून मुंबई (इ व एफ वार्ड) डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, एम.ए., पी.एच.डी., डी.एससी, बार-एट-ली असे नमूद असून पुणे (पश्चिम विभाग) उमेदवार म्हणून राजाराम आर. भोळे, बी.एस.सी. यांची नावे दिसून येतात. मात्र, सोअर्स मटेरियल, जनता, खंड ३-६, मराठीचे पान नं.१० वर (मूळ जनता, १३/०२/१९३७, पान नं.२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो व त्याखाली मुंबई (ई व एफ वांद्रे), निशाणी ‘माणूस’ असे डाव्या बाजूला, तर उजव्या बाजूला राजाराम आर. भोळे यांचे फोटोखाली (ई व एफ वांद्रे), निशाणी ‘माणूस’ असे एकाच पानावर छापलेले दिसते.
यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजाराम आर. भोळे हे स्वतंत्र मजूर पक्षाचे उमेदवार एकाच मतदार संघातून, एकाच निशाणीवर उमेदवार असल्याचे दर्शविण्यात आल्याचे दिसते. विरोधाभास निर्माण करून देशविदेशातील आंबेडकर अनुयायी, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी, वाचक, इतिहासकार यांची दिशाभूल करून चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रकार होत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यांनी इतरही अनेक चुकांवर बोट ठेवले आहे. कोल्हापुरातील शासकीय मुद्रणालय यांना छपाई व बाईंडींगचे काम थांबविण्याचे आदेश देण्यात यावे व शासकीय मुद्रणालयातून या खंडाची विक्री त्वरित थांबविण्यात यावी. या खंडाची दुरूस्ती झाल्यावर वादग्रस्त खंड परत घेवून सुधारित खंड विनामूल्य उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
प्रकाश बनसोड यांचे आरोप पूर्णतः खोटे – डॉ.प्रदीप आगलावे
प्रकाश बनसोड यांनी केलेले आरोप केवळ सूडबुद्धीने केले आहेत. ‘जनता खंड ३-६’ या खंडात असे कोणतेही आक्षेपार्ह आणि इतिहासाचे विकृतीकरण करणारे बदल करण्यात आले नाहीत. ‘जनता’ च्या ६ मार्च १९३७ च्या अंकात पृष्ठ ६ वर ‘स्वतंत्र मजूर ‘पक्ष ‘ ऐवजी ‘स्वतंत्र मजूर ‘पत्र’ असे प्रकाशित झालेले आहे. हा मुद्रणदोष आहे. ‘जनता’च्या प्रत्येक अंकाच्या पहिल्या पानावरती दोन चौकटी आहेत. पहिल्या चौकटीत ‘जनता साप्ताहिक वार्षिक वर्गणीची माहिती’ तर दुसऱ्या चौकटीत संपादक, प्रकाशक व मुद्रक याची माहिती आहे. या चौकटी मूळ ‘जनता’ नुसार प्रत्येक अंकाच्या पहिल्या पानावर छापण्यात आल्या आहेत. फक्त १३ फेब्रुवारी १९३७ च्या जनताच्या पहिल्या पानावर चौकटी आहेत. पण त्यातील तो मजकूर नाही. तर याच अंकाच्या पृष्ठ २ वर श्री. राजाराम आर.भोळे यांच्या फोटो खाली ‘पुणे विभाग’ ऐवजी ‘मुंबई’ शब्द आला आहे. यावरून प्रकाश बनसोड यांनी जे आरोप केलेत ते पूर्णतः खोटे असल्याचे स्पष्ट होते, असे डॉ. प्रदीप आगलावे यांनी स्पष्ट केले.

