विदर्भ आणि मराठवाडय़ात गारपिटीमुळे शेतीचे नुकसान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर, अमरावती, नांदेड : काही दिवसांच्या अंतराने येणारा अवकाळी पाऊसच सर्वकाळी होत असल्याचे चित्र राज्यभर सर्वत्र आहे. दर महिन्यात पाऊस शेतीला नुकसान करीत असून गारपीट आणि पावसाचा तडाखा विदर्भ आणि मराठवाडय़ाला बसला. विदर्भातील एकूण ४५ हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली. यात पूर्व विदर्भातील २९२३१ हे. तर पश्चिम विदर्भातील १५,८२७ हेक्टरचा समावेश आहे. तर मराठवडय़ातील मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी महसूल मंडळातील सुमारे २५०० हेक्टर पिकांचे गारपीटीने नुकसान केले.

८ आणि ९ जानेवारीला विदर्भात गारपीट व अवकाळी पाऊस झाला. नागपूर, अमरावती व वर्धा जिल्ह्यात झालेली गारपीट पिकांना मारक ठरली. गारपिटीचा सर्वाधिक फटका अमरावती विभागात अमरावती जिल्ह्याला (१४ हजार ८३० हेक्टर) तर नागपूर विभागात नागपूर जिल्ह्याला (७ हजार ४९५ हेक्टर) बसला. प्राथिमक सर्वेक्षण अहवालानुसार, नागपूर विभागात नागपूर जिल्ह्यातील ११ गावांना, वर्धा जिल्ह्यातील ५२, भंडारा जिल्ह्यातील ८९, गोंदिया जिल्ह्यातील १८५,चंद्रपूर जिल्ह्यातील ३२६, गडचिरोली जिल्ह्यातील ७१४ अशा एकूण १ हजार ३७७ गावांतील २९२३१ हेक्टर तर अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यात चार तालुक्यांमधील ९६ व अकोला जिल्ह्यातील एका तालुक्यातील सहा गावांतील एकूण १५,८२७ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. मराठवाडय़ातील मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी, मांजरी, सतनूर, हिंवळनारी, कदनूर, माकणी आदी गावांमध्ये गारपीट व पाऊस झाला असून यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढल्या आहेत. मुखेड परिसरातील नुकसानीची कृषी व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी पाहणी केली.

चौकट

‘‘पीकहानीचे पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहे. अहवाल आल्यावर शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जाईल.’’

– विजय वडेट्टीवार, मदत व पुनर्वसन मंत्री

‘‘शेतकऱ्यांवर निसर्ग कोपला आहे. पिकांची मोठी हानी झाली आहे, सर्वेक्षण करताना सरकारी यंत्रणेने मानवी भूमिका घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा, घरांच्या पडझडीचाही त्यात समावेश करावा.’’

– सुनील केदार, पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री

कहर सुरूच..

नागपूरसह संपूर्ण विदर्भातच कमीअधिक प्रमाणात कोसळलेल्या पावसाने गारठा प्रचंड वाढला आहे. शुक्रवारपासून पावसाच्या परतीचे संकेत हवामान खात्याने दिल्याने शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनीही सुस्कारा सोडला होता.  शुक्रवारी विदर्भात बहुतांश भागात पावसाचा कहर सुरूच होता.

पिके नष्ट..

विदर्भातील हरभरा, लाखोळी, गहू, ज्वारी, करडई, मोहरी, भाजीपाला तूर, कापूस हळद, कांदा, या पिकांसह संत्री, केळी आणि पपई या फळपिकांचेही नुकसान झाले. मराठवाडय़ातील ज्वारी, गहू, करडी, हरभरा, कांदा यासाठी पेरू व टरबूज या फळपिकांचे नुकसान झाले

महाराष्ट्रात सर्वाधिक बळी पावसाचे

२०२१ या वर्षांत चक्रीवादळे आणि पावसामुळे विविध दुर्घटना घडून देशात एकूण १७५० नागरिकांचा बळी गेल्याची माहिती हवामान विभागाच्या अहवालातून समोर आली. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक एकूण ३५० नागरिकांचा बळी गेला. महाराष्ट्रात सर्वात अधिक २१५ नागरिक पूर, अतिवृष्टी आणि दरडींचे बळी ठरले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Damage agriculture hail farmers farm ysh
First published on: 15-01-2022 at 00:12 IST