नागपूर : दानापूर-बंगळुरू विशेष एक्स्प्रेसच्या डब्यातील ‘एसी’ अचानक निकामी झाल्यामुळे संतप्त प्रवाशांनी बुधवारी गोधनी रेल्वे स्थानकावर जोरदार गोंधळ घातला . नागपुरातील कडक उन्हाळा आणि डब्यातील प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
कडक उन्हात प्रवाशांची घुसमट
बुधवारी दानापूर-बंगळुरू एक्स्प्रेसच्या ‘ए-२’ क्रमांकाच्या डब्यातील वातानुकूलित यंत्रणा अचानक बंद पडली. नागपुरात सध्या उन्हाचा पारा कमालीचा वाढलेला आहे. त्यातच या एसी डब्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने आत कोंदट वातावरण निर्माण झाले होते. पंखे आणि एसी दोन्ही बंद असल्याने प्रवाशांना श्वास घेणेही कठीण झाले होते. लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांचे यामुळे अतोनात हाल झाले. रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करूनही वेळेत दखल न घेतल्याने प्रवाशांमध्ये असंतोष पसरला होता.
गोधनी स्थानकावर गाडी रोखली
दरम्यान, केरळ एक्स्प्रेसला मार्ग देण्यासाठी ही विशेष गाडी नागपूरनजीकच्या गोधनी रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली. गाडी थांबताच आधीच हैराण झालेल्या प्रवाशांच्या संयमाचा बांध सुटला. संतप्त प्रवाशांनी थेट फलाटावर उतरून रेल्वे प्रशासनाविरोधात घोषणा सुरू केल्या. जोपर्यंत वातानुकूलित यंत्रणा दुरुस्त होत नाही, तोपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा प्रवाशांनी घेतला. यामुळे स्थानकावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर रेल्वे प्रशासनाने नागपूर स्थानकावर ही यंत्रणा तातडीने दुरुस्त करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर प्रवाशांचा राग शांत झाला आणि गाडी नागपूरकडे रवाना झाली.
अतिरिक्त गर्दीमुळे यंत्रणेवर ताण
दुपारी सव्वा एक वाजता ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ६ वर पोहोचली. तेथे रेल्वेच्या विद्युत विभागाचे तांत्रिक पथक आधीच सज्ज होते. कर्मचाऱ्यांनी तातडीने डब्याची तपासणी करून वातानुकूलित यंत्रणेतील बिघाड दूर केला. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रेल्वेगाडी जुन्या ‘आयसीएफ’ पद्धतीची विशेष गाडी आहे. उन्हाळ्यामुळे आधीच तापमान वाढलेले असताना, डब्यात क्षमतेपेक्षा अधिक गर्दी झाल्यामुळे वातानुकूलित यंत्रणेवर क्षमतेपेक्षा जास्त ताण आला आणि ती ‘ट्रिप’ झाली.
‘विशेष’ गाड्यांच्या सुमार दर्जावर प्रश्नचिन्ह
रेल्वे प्रशासनाने नागपुरात पावले उचलून बिघाड दुरुस्त केला असला, तरी या घटनेमुळे रेल्वेच्या ‘विशेष’ गाड्यांमधील सुमार दर्जाच्या सुविधा आणि देखभालीचा अभाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे विशेष गाड्या सोडते. मात्र, या गाड्यांचे भाडे नियमित गाड्यांपेक्षा जास्त असूनही प्रवाशांना अशा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जादा पैसे मोजूनही नरकयातना भोगाव्या लागत असल्याने प्रवाशांमधून रेल्वेच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.
