नागपूर : वाराणसीहून नागपूरकडे परतणाऱ्या महिलांना दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये छेडछाड, अश्लील शेरेबाजी आणि विनयभंगाच्या प्रकारांचा सामना करावा लागल्याचा आरोप आहे. तक्रारीनंतरही तत्काळ कारवाई न झाल्याने नैनी स्थानकावर प्रवाशांनी आंदोलन केले.
बिहार आणि उत्तर प्रदेशातील पर्यटनस्थळांना भेट देऊन परतणाऱ्या नागपूरातील काही महिला व त्यांच्या कुटुंबीयांना रेल्वे प्रवासादरम्यान गंभीर गैरप्रकारांना सामोरे जावे लागल्याचा आरोप आहे. वाराणसीहून नागपूरकडे येताना दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये अश्लील शेरेबाजी, छेडछाड आणि विनयभंगाचे प्रकार घडल्याचा दावा पीडितांनी केला आहे. या संदर्भात रेल्वे हेल्पलाइन, रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांकडे तक्रारी करूनही तत्काळ कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आरक्षित डब्यात अनधिकृत प्रवाशांची गर्दी
पीडितांच्या माहितीनुसार, २७ जून रोजी नागपुरातील काही कुटुंबे पर्यटनासाठी बिहार आणि उत्तर प्रदेशात गेली होती. ३ जुलैच्या रात्री वाराणसीहून परतीच्या प्रवासासाठी दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये त्यांचे आरक्षण होते. मात्र, आरक्षित डब्यात क्षमतेपेक्षा अनेक पटीने अधिक प्रवासी असल्याने डब्यात प्रवेश करणेही अवघड झाले. सुमारे ७२ प्रवाशांच्या क्षमतेच्या डब्यात ४०० हून अधिक अनधिकृत प्रवासी असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. मोठ्या प्रयत्नांनी डब्यात प्रवेश केल्यानंतरही आसनापर्यंत पोहोचताना महिलांना अश्लील शेरेबाजी, धक्काबुक्की आणि छेडछाडीचा सामना करावा लागल्याचे त्यांनी सांगितले.
तक्रारीनंतरही कारवाईचा अभाव
घडलेल्या प्रकारानंतर पीडितांनी रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ तसेच रेल्वेच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावर तक्रार नोंदवली. तक्रारीची दखल घेत कारवाईचे आश्वासन देण्यात आले, मात्र प्रत्यक्षात कोणताही अधिकारी किंवा तिकीट तपासनीस संबंधित डब्यात पोहोचला नसल्याचा दावा करण्यात आला आहे.म.
नैनी स्थानकावर आंदोलन, पोलिसांवरही आरोप
रेल्वेगाडी नैनी रेल्वे स्थानकावर आल्यानंतर संतप्त महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी रेल्वे रुळावर उतरून इंजिनसमोर आंदोलन केले. छेडछाड करणाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय रेल्वे पुढे जाऊ देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, ४०० हून अधिक प्रवाशांच्या गर्दीतून आरोपींची ओळख तुम्हीच पटवून द्या, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याचा आरोप पीडितांनी केला आहे.
नागपुरात लेखी तक्रार, चौकशीची मागणी
रात्री उशिरा काही प्रवाशांनी डब्यातील दिवे बंद करून झोपलेल्या महिलांच्या शेजारी येऊन झोपणे, शरीराला जाणूनबुजून स्पर्श करणे आणि अश्लील वर्तन करणे असे प्रकार केले. भीतीच्या वातावरणात त्यांना त्याच डब्यातून सुमारे २० तासांचा प्रवास करून नागपूर गाठावे लागले. नागपुरात आल्यानंतर त्यांनी लोहमार्ग पोलिसांकडे लेखी तक्रार दिली. मात्र, घटना उत्तर प्रदेशातील असल्याने तेथील पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासंदर्भात नागपूर लोहमार्ग पोलिसांशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही. तर रेल्वे सुरक्षा दलाच्या सूत्रानुसार लोहमार्ग पोलिसानी तक्रार घेतली आणि ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडली. त्या ठाण्याला ई-मेलद्वारे तक्रार पाठवली.
