वर्धा : विदर्भभूषण व लोकप्रिय नेते दत्ता मेघे यांचे रविवारी रात्री नागपूर येथील निवासस्थानी निधन झाले. गुढीपाडव्यास त्यांनी दिलेली भेट ही वर्धेतील शेवटची भेट ठरली. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार नागपूर येथील खामला निवासी दुपारी १ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यविधी दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर सावंगी येथील वैद्यकीय विद्यापीठ परिसरातील संकल्प या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी राहणार आहे. येथून दुपारी अडीच वाजता त्यांची अंत्ययात्रा पवणारकडे निघणार.
पवणारच का?
दत्ता मेघे यांचे पवणार हे जन्मगाव. दहावीपर्यंत इथेच शिकले. ईथे त्यांनी स्वतः घेतलेली शेती व घर आहे. आपल्याला शेवटचा निरोप गावीच देण्यात यावा, अशी ईच्छा त्यांनी पूर्वीच बोलून दाखविली होती. त्यानुसार त्यांच्या शेतात अंत्य संस्कार करण्याची तयारी काल रात्रीपासून सुरू झाली. माजी सरपंच अजय गांडोळे सांगतात की, आज पहाटेपर्यंत शेतात मोकळे मैदान करून पूर्ण झाले आहे. बाकी तयारी सुरू आहे. १५०० आसन क्षमतेचे २ पेंडाल तयार होत आहे. एक व्हिआयपीसाठी तर दुसरा कौटुंबिक मंडळीसाठी. गाव आज अत्यंत शोकाकुल अवस्थेत आहे. कारण मेघे साहेबांचा गावावर खूप जीव होता.
पवणारच्या आठवणी
या गावाची ओळखच पवणार मेघे अशी आहे. दत्ता मेघे यांची लहानपणी हलाकीची स्थिती होती. कसेबसे शिकले. मग वर्ध्यात एका खोलीत राहण्यास आले. मी आईसस्प्रोट विकून दिवस काढले, असे मेघे स्वतः सांगत. पुढे उंच भरारी व कुबेर श्रीमंती आल्यावरही ते गाव विसरले नाही. वर्धा – नागपूर रस्त्यावरील या गावात त्यांनी मग मोठे घर बांधले. आणि मुक्कामी असायचे. गावातील कार्यक्रमास त्यांची नेहमी मदत होत असे, अशी नोंद गांडोळे करतात.
शाळेप्रती आत्मीयता
पवणार येथील शाळेत लहानपणी शिकलेल्या दत्ता मेघे यांनी शाळेतील मुलांना नेहमी प्रोत्साहन दिले. बांधकामास मदत केली. शालेय स्पर्धेत मुलांची बक्षीस रक्कम मुलींपेक्षा अधिक असल्याचे पाहून मेघे नाराज झाले होते. लगेच म्हणाले की मुलींना पण तेवढेच बक्षीस द्या. ते पैसे मी देतो, अशी आठवण एक शिक्षक काढतात. गावातील काही निराधार वृद्धाना एक संस्था रोज जेवण द्यायची. हे कळताच मेघे यांनी सर्वच अश्या वृद्धाना जेवण द्या. पैसे मी देत जाईल, अशी विनंती केली.
शेतीचे ममत्व
पवणार येथे त्यांनी स्वतः शेती विकत घेतली होती. ती घेतल्यावर त्यांनी हितचिंतक व वैद्यकीय महाविद्यालय परिवारातील लोकांना बोलावले होते. येथूनच चांगले धान्य कॉलेजच्या वसतीगृहात जाणार. तसेच रुग्ण व विद्यार्थ्यांना येथील डेअरीतून शुद्ध दूध पुरवठा होईल. गावात पण डेअरी व्यवसाय वाढावा म्हणून प्रयत्न करणार, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. खऱ्या अर्थाने ते भूमिपुत्र म्हणून पवणारला जागले, अश्या आठवणी गावकरी सांगतात. आणि म्हणूनच अखेरचा निरोप पण याच मातीत.
