यवतमाळ : राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे नाईक बंगल्यावर सदिच्छा भेट दिली. मात्र, या भेटीदरम्यान त्यांनी जिल्ह्यातील ज्वलंत शेतकरी प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सोयाबीनचा पीक विमा आणि प्रलंबित कर्जमाफी यांसारख्या गंभीर प्रश्नांवर कृषिमंत्री काहीतरी ठोस बोलतील, अशी अपेक्षा असताना त्यांनी केवळ राजकीय गाठीभेटींना महत्त्व दिल्याने कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तिलांजली दिल्याची भावना व्यक्त होत आहे.

नाईक यांच्या प्रकृतीची विचारपूस, मात्र शेतकऱ्यांशी संवाद नाही

कृषिमंत्री भरणे यांनी शुक्रवारी पुसद येथे अचानक दिलेल्या या भेटीत माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या निवास्थानी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. मनोहर नाईक हे काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकीय व सार्वजनिक क्षेत्रापासून अलिप्त आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांनी काय चर्चा केली याचा तपशील उपलब्ध नाही. मात्र केवळ मनोहर नाईक यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कृषीमंत्री आले होते, असे नाईक यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. यावेळी मनोहर नाईक यांचे चिरंजीव तथा राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे उपस्थित नव्हते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नाईक बंगल्यावर दुर्मीळ वस्तू, छायाचित्रांचे अवलोकन केले. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या छायाचित्रांचे अवलोकन करताना कृषिमंत्र्यांनी आदरांजलीही वाहिली. मात्र, ज्या वसंतराव नाईक यांनी शेती आणि शेतकऱ्यांसाठी आपले आयुष्य वेचले, त्यांच्याच कर्मभूमीत कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यास वेळ काढला नाही, याबद्दल शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

आढावा बैठकीला बगल, कार्यकर्त्यांच्या सत्काराला प्राधान्य

यवतमाळ जिल्हा सध्या पीक विमा आणि कर्जमाफीच्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळे होरपळत आहे. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचे आदेश अद्याप तळागाळापर्यंत पोहोचलेले नाहीत. अशा परिस्थितीत, कृषिमंत्र्यांनी जिल्ह्यात येऊन एखादी आढावा बैठक घेणे अपेक्षित होते. मात्र, त्याऐवजी पुसद येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आणि हार-तुऱ्यांनी स्वतःचा सत्कार करून घेण्यातच ते व्यस्त दिसले, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते मनीष जाधव यांनी केली.

कृषिमंत्र्यांनी जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप

कृषिमंत्र्यांच्या या दौऱ्यात त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्याची तयारी केली होती. याची कुणकुण लागताच कृषिमंत्र्यांनी विश्रामगृहावर येणे टाळले आणि छुप्या पद्धतीने आपला दौरा उरकून काढला, असा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे. आमच्या प्रश्नांवर संवाद साधण्याचा आग्रह धरला असता, कृषिमंत्र्यांच्या ओएसडींनी दौरा रद्द झाल्याची चुकीची माहिती देऊन आमची दिशाभूल केली, असा आरोप मनीष जाधव यांनी केला. कृषिमंत्र्यांचा हा दौरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरल्याची टीका जाधव यांनी केली. कृषिमंत्र्यांच्या अशा वागणुकीमुळे यवतमाळच्या शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, नेत्यांना भेटायला कृषिमंत्र्यांकडे वेळ आहे, पण अन्नदात्यासाठी नाही का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.