उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरातील पूरस्थितीची पाहणी केली आहे. शहरातील जवळपास जवळपास दहा हजार घरांचं नुकसान झालं आहे. पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर फडणवीसांनी नुकसानभरपाई करण्याबाबत विधान केलं आहे. लोकांना जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल, तेवढी मदत आम्ही करू. लोकांच्या घरातील चिखल काढण्याचं काम सुरू केलं आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, भविष्यात एवढं पाणी आल्यानंतर किमान ते घरांमध्ये शिरणार नाही, त्यादृष्टीने आपल्याला काम करावं लागेल. काही नाल्याच्या आणि नाग नदीच्या भिंती तुटलेल्या आहेत. त्या भिंती तयार कराव्या लागतील. अंबाझरीच्या संदर्भात मी काल बोललो आहेच. या तलावाचा जो 'ओव्हर फ्लो पॉइंट'वर आपल्याला पायाभूत सुविधांचं काम करावं लागेल. ते काम करण्याचा विचार राज्य सरकार करेल." हेही वाचा- नागपूर : केअर रुग्णालयातील ७० रुग्ण इतरत्र हलवले; पावसाचा तडाखा, धावाधाव नुकसानभरपाईबाबत फडणवीस म्हणाले, "लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हे दु:ख सहन करणं त्यांना कठीण आहे. आपण देखील बघितलं असेल, लोक रडकुंडीला आल्यासारख्या त्यांच्या प्रतिक्रिया देत होते. त्यांना जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल, तेवढा आमचा प्रयत्न असेल." हेही वाचा- नागपुरातील पुरात नुकसान झालेल्यांना फडणवीसांकडून मदतीची घोषणा; म्हणाले, “चिंतेची बाब एवढीच की…” देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, शहरात सुमारे दहा हजार घरांचं नुकसान झालं आहे. लोकांच्या घरात चिखल आहे. तो चिखल काढण्यासाठी काम सुरू केलं आहे. लोकांना क्लोरीनच्या गोळ्या देण्यासही सांगितलं आहे. तसेच लोकांना पूर्ण साफसफाई करण्यास मदत करू.