मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सेमाडोह जंगल सफारी मार्गावर वनखंड क्रमांक १६९ मध्ये एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला. या नर बिबट्याचे वय पाच वर्षांचे होते. बिबट्याच्या मृत्यूचे कारण लगेच कळू शकले नसले, तरी हा शिकारीचा प्रकार नसल्याची शक्यता वनविभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सेमाडोह जंगल सफारी मार्गावर वनपाल बाबुराव खैरकर हे मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास गस्तीवर असताना त्यांना वनखंड क्रमांक १६९ मध्ये एक बिबट्या मृतावस्थेत दिसून आला. त्यांनी लगेच या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम आणि उपवनसंरक्षक दिव्या भारती यांना दिली. वन अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. शवविच्छेदनानंतर बिबट्यावर अग्निसंस्कार करण्यात आले. या बिबट्याचा मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याची शक्यता वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.