तीन वर्षांनंतर पालकांशी भेट

नागपूर : तीन वर्षांआधी उत्तर प्रदेशातील आपल्या पालकांपासून नागपूर रेल्वेस्थानकावर दुरावलेल्या मूकबधिर जयंतची शासकीय मुलांचे बालगृह कनिष्ठ, नागपूर या संस्थेने मोठय़ा परिश्रमाने कुटुंबाशी भेट घडवून आणली. जयंत मूकबधिर असल्याने घरचा पत्ता सांगणे अशक्य होते. त्यात तो अशिक्षितही. शेवटी आधार कार्ड तयार करताना जयंतच्या बोटाचे ठसे घेतले असता त्याचा मूळ पत्ता सापडला. उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने जयंतला तीन वर्षांनी त्याच्या कुटुंबाच्या हवाली करण्यात आले.

जयंतला शासकीय मुलांचे बालगृह कनिष्ठ, नागपूर या संस्थेत १३ मार्च २०२० ला बाल कल्याण समितीच्या आदेशाने काळजी व संरक्षणासाठी दाखल करण्यात आले होते. हा बालक रेल्वेस्थानकावर विनापालक आढळून आला होता. त्याला बालकल्याण समिती यांच्या आदेशने  शासकीय मुलांचे निरीक्षणगृह, बालगृह चंद्रपूर येथे स्थानांतरित करण्यात आले होते. त्यानंतर बाल कल्याण समितीच्या आदेशाने नागपूर शासकीय वसतिगृहामध्ये  स्थानांतरण करण्यात आले. दरम्यान, बालकाचे नवीन आधार कार्ड तयार करण्यासाठी संस्थेकडून प्रयत्न करण्यात आले. परंतु आधार कार्ड तयार करताना संकेतस्थळावरून ते नाकारले जात होते. आधार कार्ड तयार होत नसल्याने संस्थेच्या अधीक्षकांनी आधार कार्ड सेवा केंद्राच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधून  मुलाला केंद्रावर नेले. येथे बालकाच्या बोटाचे ठसे घेऊन नवीन आधार कार्डची प्रक्रिया सुरू केली असता त्या मुलाचा मूळ पत्ता  मिळाला. तो उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्याचा रहिवासी होता. त्यावरून सोनिकपूर पोलिसांशी पत्रव्यवहार करून त्याच्या पालकांचा शोध घेण्यात आला. पोलिसांच्या सहाय्याने संपूर्ण कार्यवाही पूर्ण करून जयंतला त्याचे नैसर्गिक पालक राम लौटण चौहाण यांच्या ताब्यात देण्यात आले. वडील व मुलाने एकमेकांना बघून  मिठी मारली. ही घटना संस्थेतील कर्मचाऱ्यांचेही मन  हेलकावून टाकणारी होती. ही कार्यवाही नागपूरच्या शासकीय मुलांचे बालगृह या संस्थेचे अधीक्षक विनोद डाबेराव, समुपदेशक महेश रणदिवे यांनी केली. तसेच यासाठी शासकीय मुलांचे अनुरक्षणगृह या संस्थेचे अधीक्षक दीपक बानाईत व समुपदेशक विनोद बोरकर तसेच संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.