यवतमाळ : शेतातून परत येत असताना पती-पत्नी तलावाच्या सांडव्यात पाय घसरून पडले व पुरात वाहत गेले. यात दोघांचाही मृत्यू झाला. सुभाष राऊत (५५) व सुरेखा राऊत (५२) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथे आज सोमवारी घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वरुड जहांगीर येथील अल्पभूधारक शेतकरी सुभाष राऊत व त्यांची पत्नी सुरेखा राऊत हे दररोज जागलीकरिता शेतात जात होते. त्यांना गावातील तलाव पार करून शेतात जावे लागत होते. नेहमीप्रमाणे ते रविवारी रात्रीसुद्धा शेतात गेले होते. मात्र, रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. दोघे पती-पत्नी आज सोमवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास शेतातून गावाकडे परत येत होते. मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरला होता. पती-पत्नी तलावाच्या खालच्या ‘ओव्हरफ्लो’मधून येत असताना त्यांचा पाय घसरला व दोघेही एकमेकाला वाचवण्याच्या नादात पुरात वाहून गेले. यात दोघांचाही मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह नाल्यातील एका झाडाला अडकल्याने सापडले. राऊत दाम्पत्यास दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death husband wife swept away floods incidents ralegaon taluka ysh
First published on: 08-08-2022 at 18:36 IST