scorecardresearch

२९ बछड्यांना जन्म देणाऱ्या ‘महामाते’चा मृत्यू

२००८ ते २०१९ या दरम्यान तिने तब्बल २९ बछड्यांना जन्म दिला होता. हा एक विक्रम मानला जातो. 

नागपूर :  टी-१५ तसेच ‘कॉलरवाली’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व अकरा वर्षांत २९ बछड्यांना जन्म देऊन ‘सुपर मॉम’ ठरलेल्या १७ वर्षीय वाघिणीचा शनिवारी संध्याकाळी पेंच प्रकल्पातील राखीव वनक्षेत्रात वार्धक्यामुळे मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने वन्यप्रेमी हळहळले आहेत.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) मार्गदर्शक तत्त्वांनुसार मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली, असे पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ‘कॉलरवाली वाघिण’, ‘पेंचची राणी’ ‘सुपर मॉम’ अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वाघिणीने २००८ ते २०१९ या  ११ वर्षांमध्ये २९ बच्छड्यांना जन्म दिला होता. यापैकी २५ बछडे जिवंत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वार्धक्यामुळे अशक्त झालेली ही वाघीण शुक्रवारी, १४ जानेवारीला जंगलात पर्यटकांना शेवटची दिसली.

तज्ज्ञांच्या मते, वाघाचे सरासरी वय सुमारे १२ वर्षे असते. मार्च २००८ मध्ये या मादीला रेडिओ कॉलर लावण्यात आले होते. त्यानंतर रेडिओ कॉलरने काम करणे बंद केले होते, जानेवारी २०१० मध्ये तिला पुन्हा रेडिओ कॉलर लावले होते. नंतर ही वाघीण ‘कॉलरवालीर’ किंवा टी-१५ या नावाने प्रसिद्ध झाली.

सप्टेंबर २००५ मध्ये प्रसिद्ध वाघीण टी-७ ने  चार बछड्यांना जन्म दिला होता.  यापैकी एक म्हणजे ही ‘कॉलरवाली’ वाघीण होय. या वाघिणीने नंतर मे २००८ मध्ये प्रथम तीन बछड्यांना जन्म दिला होता, पण ते जगू शकले नव्हते. त्यानंतर २३ ऑक्टोबर २०१० पाच शावकांना (चार मादी आणि एक नर) जन्म दिला होता. शेवटच्या वेळी या वाघिणीने डिसेंबर २०१८ मध्ये चार बछड्यांना जन्म दिला होता, असे पी.टी.आय.च्या वृत्तात नमूद केले आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Death of collarwali tiger akp

ताज्या बातम्या